दीपाली सय्यद यांची भाजप नेत्या उमा खापरे यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार

दीपाली सय्यद यांची भाजप नेत्या उमा खापरे यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार

मुंबई, दि. 2 जून - शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरेंविरोधात मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिपाली सय्यद यांना घरात घुसून बदडून काढू असा इशारा उमा खापरे यांनी दिला होता. दिपाली सय्यद यांनी भाजप नेत्यांवर केलेल्या हल्लाबोलनंतर भाजपकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. भाजप महिला कार्यकर्ता दिपाली सय्यद यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. मात्र उमा खापरेंविरोधात दिपाली सय्यद यांनी तक्रार दाखल केली आहे.

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात उमा खापरेंविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे. त्या पद्धतीने मी चालली आहे. तक्रार केली असून त्याचा परिणाम येत्या काळात दिसेल असे दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.

दिपाली सय्यद म्हणाल्या की, भाजपचे लोकं सोशल मीडियावर अश्लील पद्दतीने ट्रोलिंग करतात, खालच्या थराला जाऊन बोलतात. त्यांच्याकडूनच ही सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील जनता सगळं पाहत आहे. मारण्याची धमकी देणाऱ्याच्या पाठीशी भाजपचे लोकं उभे राहतात. राणांच्याबाजूला उभे राहिले. आता माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहेत. किरीट सोमय्यांनासुद्धा पाठिशी घालता. सोमय्यांनी ज्या लोकांवर आरोप केले ते नेते भाजपमध्ये गेल्यावर पवित्र झाले आहेत. सोमय्या आता कुठे आहेत? असा सवालसुद्धा दिपाली सय्यद यांनी केला आहे.

दिपाली सय्यद यांनी ट्विट करुन भाजप नेते किरीट सोमय्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. भाजप नेते किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर नेते भाजपामध्ये जावून पवित्र होतात. त्यानंतर त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही. या नेत्यांना पाठीशी घालणारा असा लुच्चा पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल अशी टीका दिपाली सय्यद यांनी केली होती. यावर उमा खापरेंनी प्रतिक्रिया देताना दिपाली सय्यद यांनी कोणत्याही भाजप नेत्याबद्दल अपशब्द काढले तर त्यांना घरात घुसून बदडून काढू असा इशारा दिला आहे.