छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आक्रमक, ठिकठिकाणी आंदोलन 

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आक्रमक, ठिकठिकाणी आंदोलन 
मुंबई - 
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी घडला. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विटंबना ही छोटी गोष्ट असल्याचं वक्तव्य केलं.  या प्रकारामुळे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आक्रमक झाली असून जोरदार घोषणाबाजी करत तसेच बोम्मई यांच्या पुतळ्याला जोडे मारत राज्यात ठिकठिकाणी शनिवारी संध्याकाळपासून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तर रविवारी अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. 

दक्षिण मुंबईत शनिवारी संध्याकाळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक गोळा झाले. त्यावेळी त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयाबाबत बोम्मई यांच्या निषेधाचे बॅनर झकावले. तसंच भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ‘बोम्मई म्हणतात की अशा छोट्यामोठ्या गोष्टी होत असतात. म्हणजे शिवाजी महाराज हे छोटी-मोठी गोष्ट आहेत का? मग भाजपचं शिवरायांवरील प्रेम बेगडी आहे का? या गोष्टीचा फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण हिंदुस्तानात निषेध व्यक्त केला पाहिजे. कर्नाटक सरकार जर माफी मागणार नसेल तर त्यांच्या बसेस महाराष्ट्रात येतात. त्याचा त्यांनी विचार करावा, असा सूचक इशारा पांडुरंग सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय. दरम्यान, भाजप कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शिवसैनिकांनी आपल्याला शिविगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना आवाहन
छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
देशात कुठेही शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच- देवेंद्र फडणवीस
‘आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत.त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच! ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईलच!’ असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.
ठाण्यात, पुण्यात, नाशकात राष्ट्रवादीचे आंदोलन 
मुंबईपाठोपाठ ठाण्यातही कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज ठाण्यात जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली.पुण्यातदेखील रविवारी सकाळी राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी बोम्मई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. नाशिक शहरातही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कानडीगांचा निषेध नोंदवण्यात आला. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांचाही यावेळी समाचार घेण्यात आला.