चऱ्होली गायत्री विद्यालयात हरीनामाचा जयघोष  पालखी सोहळा उत्साहात

चऱ्होली गायत्री विद्यालयात हरीनामाचा जयघोष  पालखी सोहळा उत्साहात

 
आळंदी ( प्रबोधन न्यूज)  -   येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या चऱ्होली येथील गायत्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये अतिशय उत्साहात पालखी सोहळा शालेय मुलांचे नामजयघोषात पार पडला. संस्थाध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी विद्यार्थ्यांना 'कृतीला श्रद्धेची जोड हवी 'असे मार्गदर्शन करत भक्ती भावाचा रंग भरला.
 या प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त सरिता विखे पाटील, कार्यकारी संचालिका कविता कडू पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
  टाळ, मृदुंग, वीणा, तुळशीहार लेऊन आलेल्या सर्व बालगोपाळांनी वारकरी वेशात हरिनामाच्या गजरात पालखी सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. सरिता विखे पाटील यांनी सर्व शिक्षकां समवेत विद्यार्थ्यांमध्ये फुगडी खेळून सर्व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. टाळ ,मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषाने शाळेचा संपूर्ण परिसर भक्ती भावाने भरून गेला होता. पालखीची सुंदर सजावट, विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील मुले मनमोहक दृश्यांनी जणू काही प्रत्यक्ष दिंडीचा अनुभूती देणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी आनंददायी व स्मरणीय ठरला. मुख्याध्यापिका ज्योती दरेकर यांनी संपूर्ण शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांना यावेळी मार्गदर्शन केले.
आळंदी ग्यानज्योत इंग्लिश स्कूल मध्ये रंगला पालखी सोहळा  
येथील मुक्तादेवी शिक्षण प्रसारक मंडळ व पद्मावती देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी वारी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाखात व विठ्ठल रखुमाई यांच्या वेशभूषेत पावली, फुगडी, अभंग या सर्वांचा मनमुराद आनंद लुटला. पालखी सोहळा सुरू असताना अचानक आलेल्या पावसाने सोहळ्यात आणखीनच रंगत आणली.सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी पावसात भिजत या सोहळ्याचा आनंद लुटला.
  या प्रसंगी पालखीचे पूजन मुख्याध्यापिका प्रीती उंबरकर, रश्मी संभे यांनी केले. संस्थेचे  संस्थापक अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, संचालिका कीर्ती घुंडरे, व्यवस्थापक विजय धादवड, अक्षय चपटे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. या पालखी सोहळ्याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. पालखी सोहळा पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.