1 जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार, उद्धव ठाकरे यांची घोषणा

1 जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार, उद्धव ठाकरे यांची घोषणा

  मुंबई, (प्रबोधन न्यूज ) -    मुंबई महापालिका निवडणुकीच्या  तोंडावर शिवसेनेतील   आऊटगोईंग थांबवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे  प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची शिवसेना भवन  इथं बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे  यांनी माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर  उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत विकासकामांच्या नावाखाली शिंदे सरकारनं महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी सुरू केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय. या उधळपट्टीविरोधात शिवसेना 1 जुलैला मुंबईत विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. 

ठाकरे गटाचा विराट मोर्चा
येत्या एक जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा  काढणार असल्याची घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. एक वर्ष होऊन गेलं, महापालिका विसर्जित झाली आहे. पावसाप्रमाणे निवडणूकाही लांबत चालल्या आहेत. निवडणुका घेण्याची हिम्मत आताच्या बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. सध्या वारेमाप उधळपट्टी सुरु आहे. रस्त्याच्या नावाने असेल, जी 20 च्या नावाने असेल, मुंबईला कोणीही मायबाप राहिलेला नाही. सर्व लुटालूट सुरु आहे. महापालिकेतील या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या एक जुलैला शिवसेना ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.