दलितांचे आरक्षण धोक्यात आणणाऱ्या भाजपला पराभूत करा - जयदेव गायकवाड (video)

राज्यातील आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे आरक्षणाला विरोध करणारे आहे. दलितांचे आरक्षण या सरकारने धोक्यात आणण्याचा विडा उचलला आहे.

दलितांचे आरक्षण धोक्यात आणणाऱ्या भाजपला पराभूत करा - जयदेव गायकवाड (video)

ॲड. जयदेव गायकवाड यांचे नाना काटेंना विजयी करण्याचे आवाहन

पिंपरी दि. 23 - राज्यातील आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे आरक्षणाला विरोध करणारे आहे. दलितांचे आरक्षण या सरकारने धोक्यात आणण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे दलितविरोधी आणि संविधानविरोधी सरकारला पराभूत करण्याची संधी चिंचवड पोटनिवडणुकीतून आंबेडकरी विचारांच्या मतदारांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना विजयी करून संविधानविरोधी शक्तीचा पराभव करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख ॲड. जयदेव गायकवाड यांनी केले.

पिंपळे सौदागर येथे पत्रकार परिषदेत ॲड. जयदेव गायकवाड बोलत होते. त्यावेळी संजय कांबळे, पंडित कांबळे, दत्ता गायकवाड आणि मयूर जाधव उपस्थित होते. शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा भाजपच्या पायाखालील वाळू घसरल्याचे लक्षण आहे. भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचे असेल तर दलित मतांचे होणारे विभाजन टाळावे लागेल.

आंबेडकरी विचारांचा वारसा चालवायचा असेल आणि सत्तेत वाटा मिळवायचा असेल तर भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हटवावे लागेल. परंतु वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर भाजपला पूरक भूमिका घेत आहेत. त्यांच्या हट्टवादी भूमिकेमुळे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांचा पराभव झाला. त्याचा अप्रत्यक्ष लाभ भारतीय जनता पक्षाला झाला, असे गायकवाड यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणातून दलित समाजाच्या हिताचे रक्षण होणार नाही. त्यामुळे 17 वर्ष त्यांच्या सोबत काम केल्यानंतर मी बाजुला झालो तसे पिंपरी चिंचवड शहरातील त्याचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे हेही बाजूला झाले. भाजपला पूरक भूमिका घेणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला केलेले मतदान हे संविधानावर हल्ला करणाऱ्या भाजपाच्या पथ्यावर पडणारे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता परिवर्तनवादी विचारांच्या आंबेडकरी जनतेने नाना काटे यांना मतदान करावे असे आवाहन गायकवाड यांनी केले.

https://www.youtube.com/watch?v=wOJA8B0lHTw