शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढणार – एकनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवडमधील शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढला जाईल. तसेच अनधिकृत बांधकामांसाठी यापुढे कोणताही मोर्चा काढावा लागणार नाही.

शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढणार – एकनाथ शिंदे

पिंपरी (प्रबोधन न्यूज) - पिंपरी-चिंचवडमधील शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढला जाईल. तसेच अनधिकृत बांधकामांसाठी यापुढे कोणताही मोर्चा काढावा लागणार नाही. हा प्रश्न ठाण्याप्रमाणे कायमचा निकालात काढला जाईल. तसेच प्राधिकरणाचा साडेबारा टक्के जमीन परताव्याचा विषयही सिडकोप्रमाणे तातडीने मार्गी लावणार आहे. पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली असल्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना, प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणी येथील शिवेंद्र लॉन्समध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप, खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ही निवडणूक बिनविरोध होईल असे आम्हाला वाटलेले. मुंबईतल्या पोटनिवडणुकीत अनेक नेत्यांनी आवाहन केले. विनंती केली होती. महाराष्ट्राचीही परंपरा सांगितली होती. स्वतः शरद पवार बोलले. राज ठाकरे यांनीही विनंती केली. मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की निवडणूक लढवायला नको. त्यानंतर भाजपने भरलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीतही आम्ही सर्वांना बिनविरोध करण्याचे आवाहन व विनंती केली होती. ज्यांच्या विनंती मान देऊन भाजप-शिवसेनेने भरलेली उमेदवारी माघारी घेतली त्यांनी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

पिंपरी-चिंचवडमधील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शहरातील बांधकामांना लावण्यात आलेला शास्तीकर माफ करण्याचा निर्णय विधानसभेत घेतला आहे. त्याचा शासन आदेश तातडीने निघेल. अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांवर आता मोर्चा काढावा लागणार नाही. हा प्रश्न ठाण्याप्रमाणे कायमचा निकालात काढला जाईल. सिडकोप्रमाणे प्राधिकरणाचा साडेबारा टक्क्याचा विषय तातडीने मार्गी लावला जाईल. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. इंद्रायणी, पवना नदी सुधार प्रकल्प आराखडा तयार करायला सांगितला आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोला मंजुरी देण्याची सूचना केली आहे. पुणे रिंगरोड लवकरच सुरू करू, असेही ते म्हणाले.