कसबा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये धुसफूस ?

कसबा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये धुसफूस ?

पुणे (प्रबोधन न्यूज) – कसबा पोटनिवडणुकीत कै. मुक्ता टिळक यांच्या वारसांना उमेदवारी नाकारल्याने टिळक कुटुंबियांबरोबरच ब्राह्मण समाजही नाराज झाला आहे. त्यातच आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये धुसफुस असल्याचे समोर आले आहे. माजी खासदार संजय काकडे हे हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आल्याने नाराज असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

पुण्यातील कसबापेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. रासनेंचा अर्ज भरण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी कसबा पेठ गणपतीसमोर शक्तीप्रदर्शन केलं. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहर भाजपकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार संजय काकडे यांचे नाव आजच्या निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यात आले आहे. या निमंत्रण पत्रिकेवरुन भाजपमध्ये धुसफूस असल्याची चर्चा चव्हाट्यावर आली आहे. या निमंत्रण पत्रिकेची सोशल मीडियावर  जोरदार चर्चा सुरू आहे. ही पत्रिका मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यावरून  नेटकऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगली आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावरही संजय काकडे यांचा फोटो नाही. अर्ज भरण्यासाठी शहर भाजपकडून जो मेसेज व्हॉट्सॲप वर पाठवला आहे, त्यातही संजय काकडे यांचा उल्लेख नाही.

भाजपकडून काकडेंना का डावलण्यात आले, याविषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय काकडेंच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजप उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी काकडे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना का डावलण्यात आले, असा प्रश्न विचारला  जात आहे. काकडेंना डावलले तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघात माजी खासदार संजय काकडे यांना मानणारा मोठा मतदार आहे. काकडे यांचा जन्म घोरपडे पेठेतला असून वयाच्या 22 वर्षांपर्यंत काकडे यांचे घोरपडे पेठेत वास्तव्य होते. त्यामुळे घोरपडे पेठेबरोबरच 7, 8 व 9 नंबर कॉलनी, गंज पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, रविवार पेठ यामध्ये काकडेंना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय कसबा पेठेतील मुस्लिम व दलित समाज देखील काकडेंना मोठ्या प्रमाणात मानतो. तर खासदार गिरीश बापट हे आजारी असल्याने ते या निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त आहेत. या सर्वांचा परिणाम हेमंत रासने यांच्या विजयावर होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.