अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर; 3 नोव्हेंबरला मतदान तर 6 तारखेला मतमोजणी

अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर; 3 नोव्हेंबरला मतदान तर 6 तारखेला मतमोजणी

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा जागेवरील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. इथे 3 नोव्हेंबरला मतदान आणि 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जाहीर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे.

निवडणूक आयोगाकडून सोमवारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व मतदारसंघात मतदान होईल. तर ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा दुबईत हदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. एखाद्या आमदाराचा मृत्यू झाल्यास सहा महिन्यांच्या आत संबंधित मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे गरजेचे असते. त्यानुसार निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी आता शिवसेना आणि भाजपने आपले उमदेवार अगोदरच जाहीर केले आहेत.

शिंदे गटाने इथे उमेदवार देत पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता ही जागा भाजपने आपल्या घेतल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे.

शिंदे गटाकडून ही जागा आपल्याकडे घेतल्यानंतर आता भाजपा निवडणूक प्रचारासाठी सज्ज झाला आहे. भाजपाकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा निवडणूक प्रचार मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज भाजप मुंबई अध्यक्ष आणि अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे प्रभारी आशिष शेलार यांचे हस्ते करण्यात आले होते.