जीबीएस आजारग्रस्त रुग्णास मिळाले जीवनदान

जीबीएस आजारग्रस्त रुग्णास मिळाले जीवनदान

पिंपरी, दि. 2 जून - गिलियन बार सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजारग्रस्त असलेल्या रुग्णावर सूर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी उपचार करून रुग्णास जीवनदान दिले. सचिन आनंदा रणपिसे (वय ३८, रा मोरे वस्ती चिखली) असे या रुग्णाचे नाव आहे. रुग्णास वाचवण्यासाठी चिखली साने चौक येथे असलेल्या सूर्या हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. दत्तात्रय सूर्यवंशी, डॉ मनिषा देवकर, डॉ.शरद धावडे, डॉ विकास आगलावे यांनी अथक परिश्रम घेतले. 

डॉ. कुलकर्णी म्हणाले की, जीबीएस हा नसांचा लकवा आहे. घशातील किंवा पोटातील संसर्गामुळे हा आजार होतो. २/३ आठवड्यानंतर या आजाराचे लक्षणे आढळून येतात. हात पायातील ताकद कमी होते. शारीरिक जाणिवा कायम मात्र नसांची कार्यक्षमता कमी होत जाते. उपचार घेण्यास उशीर झाल्यास रुग्णास अन्न गिळायला आणि श्वास घ्यायला त्रास होतो. कालांतराने गुंतागुंत वाढते. त्वरित तपासण्या करून उपचार केल्यास रुग्ण वाचू शकतो.

सर्वसाधारणपणे या आजारामध्ये रुग्ण आपोआप बरे होतात. हा आजार दहा हजारांमध्ये ४/५ रुग्ण आढळून येतात. इतका दुर्मिळ हा आजार आहे. रुग्णाचे बंधू प्रमोद रणपिसे म्हणाले की, रुग्णास सुरुवातीला ताप व खोकला येत होता. कोविड, टीबी तपासण्या करून घेतल्यानंतर सूर्या रुग्णालयात दाखल केले. तातडीने निर्णय घेवून डॉक्टरांनी उत्तम उपचार सुरू केले. उपचारदरम्यान निमोनिया देखील झाला होता. तब्बल ३ महिन्यानंतर रुग्ण बरा झाला आहे.