‘पद्मागंधा प्रकाशन’चे अरुण जाखडे यांचे निधन

‘पद्मागंधा प्रकाशन’चे अरुण जाखडे यांचे निधन

पुणे -

मेहता पब्लिंशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्या निधनानंतर जाखडे यांच्या आकस्मिक निधनाने प्रकाशनविश्वासह साहित्य क्षेत्राला दुसरा मोठा धक्का बसला आहे. साहित्य क्षेत्रात आपले स्थान प्रस्थापित करणारे ‘पद्मागंधा प्रकाशन’चे प्रमुख आणि मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे (वय ६६) यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. झोपेत असतानाच पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

जाखडे हे सर्जनशील लेखक, साक्षेपी संपादक आणि दूरदृष्टी असलेले प्रकाशक अशा त्रिवेणी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. विशेष प्रकल्पाचे नियोजन करून काम करणे या कार्यपद्धतीमुळे जाखडे यांनी पद्मागंधा प्रकाशनच्या माध्यमातून वाङ्मयीनविश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, भाग्यविधाती, सर्जक आणि संगोपक अशी श्री तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मिथकाची प्रेरकता उलगडणारा डॉ. रा. चिं. ढेरे लिखित ‘श्री तुळजाभवानी’ हा ग्रंथ तसेच रघुनाथ धोंडो कर्वे या विसाव्या शतकातील विचारावंतांचे विचारधन हा आठ खंडांतील प्रकल्प त्यांनी प्रकाशित केला. ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’, ‘पाचरुट’, ‘पावसाचे विज्ञान’,‘प्रयोगशाळेत काम कसे करावे’, ‘भारताचा स्वातंत्र्यलढा’, ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’, ‘विश्वरूपी रबर’, ‘शोधवेडाच्या कथा’ असे विपुल साहित्य त्यांनी प्रकशित केले.

खुशवंत सिंग यांच्या इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद पद्मागंधातर्फे प्रकाशित करण्यात आला होता. याशिवाय बालवाङ्मय, विज्ञान, इतिहास अशा विविध विषयांवर त्यांनी पुस्तके प्रकाशित केली. दिल्लीच्या फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स संस्थेतर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे सहा पुरस्कार तसेच राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी दिला जाणारा श्री. पु. भागवत पुरस्कार अशा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी जाखडे यांना गौरविण्यात आले होते.