मांत्रिकेचा भक्त महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर केला बलात्काराचा प्रयत्न

मांत्रिकेचा भक्त महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर केला बलात्काराचा प्रयत्न

पुणे, दि. 30 मे – ही संतापजनक घटना हडपसरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मांत्रिकाला बेड्या ठोकल्या आहेत. धनंजय गोहाड उर्फ नाना (रा. मांजरी बुद्रुक) असं आरोपीचं नाव असून, त्याची शिष्या सुरेखा जमदाडे (रा. गंगा नगर, फुरसुंगी) ही फरार आहे. पीडित ३६ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मंत्रिकासह त्याला मदत करणाऱ्या महिला शिष्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा, विनयभंग व बलात्कार करण्याचा प्रयत्न, अपहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा मुलगा दिव्यांग आहे. त्याचे आरोग्य चांगले होईल आणि पतीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिष्या सुरेखा जमदाडे या महिलेने मांत्रिक धनंजय गोहाड (नाना) यांच्याशी पीडित महिलेची भेट घालून दिली होती. तेव्हा मांत्रिकाने दिव्यांग मुलाला दर मंगळवारी कडूनिंबाच्या पाल्याने आंघोळ घालायची, ११ सोमवार दूध-भात एकत्र शिजवून त्याचे पिंडीला लेपन करायचे, मुलावर दर पौर्णिमेला नारळ लिंबू उतरून बाहेर टाकायचे आणि काळी बाहुली दरवाजाला बांधायची तसंच शनिवारी दही, भात, उडीदाची काळी डाळ, गुलाल हे मुलाच्या अंगावर उतरून बाहेर टाकायचे असे उपाय सांगितले.

मांत्रिक आणि साथीदार एवढ्यावरच थांबले नाहीत. फिर्यादीच्या विश्वासाचा गैरफायदा घेत एप्रिल २०२२ मध्ये घरातील नकारात्मक शक्ती बाहेर काढण्याचा बहाण्याने फिर्यादी महिलेच्या घरी येऊन विधी करावे लागेल असं त्यांनी सांगितले. तेव्हा मांत्रिकाने घरी जाऊन महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिला नग्न केले नंतर आरोपी सुरेखा जमदाडे हिने रक्तचंदनामध्ये लिंबू पिळून तयार केलेला लेप महिलेच्या सर्व अंगाला लावला. यानंतर मांत्रिकाने पीडित महिलेचा विनयभंग करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे.