तारकर्ली समुद्रात बोट उलटून झालेल्या अपघातात आळेफाटा येथील डॉक्टराचा मृत्यू

तारकर्ली समुद्रात बोट उलटून झालेल्या अपघातात आळेफाटा येथील डॉक्टराचा मृत्यू

पुणे, दि. 24 मे - आळेफाटा (ता. जुन्नर) येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मारुती पिसे (वय ४५) यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २४) मालवणमधील तारकर्लीच्या समुद्र किनाऱ्यावर घडली. शांत, संयमी आणि कार्यतत्पर आणि मदतीसाठी कधीही धावून येणाऱ्या डॉक्टरांचा बुडून मृत्यू मृत्यू झाल्याने अनेक जण हळहळले आहेत.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. स्वप्नील पिसे आपल्या कुटुंबियांसह मालवणमधील तारकर्ली येथे पर्यटनासाठी गेले होते. समुद्रात एक बोट वीस पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. स्कुबा डायव्हिंग करुन बोट परतत असतानाच किनाऱ्यापासून काही मीटर अंतरावर अचानक ही बोट बुडाली. ज्यामधील 20 पर्यटकही समुद्रात बुडाले. यापैकी दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून दोन पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे.

मे महिना सुरु असल्याने सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. पर्यटकांची मोठी पसंती ही मालवणसह तारकर्लीला असते. तारकर्ली हे पर्यटनाचे माहेरघर मानले जाते. पुणे आणि मुंबईतुन एक ग्रुप पर्यटनासाठी तारकर्लीमध्ये आला होता. हे सगळेच 20 जण पर्यटक स्कुबा डायव्हिंगसाठी समुद्रात गेले होते. स्कुबा डायव्हिंग आटपून हे पर्यटक तारकर्ली समुद्र किनाऱ्याच्या दिशेने परतत होते.

दरम्यान, या संपूर्ण घटनेची पोलीस आता कसून चौकशी करत आहे. उपचार घेत असलेल्या 16 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. दरम्यान, ह्या घटनेने एकच गोंधळ उडाला. मालवण तालुक्यातील सर्व पर्यटकांमध्ये एकच घबराट पसरली आहे.