राज ठाकरेंमुळेच उद्धव कार्याध्यक्ष; संदीप देशपांडेंचा राऊतांवर प्रतिवार

राज ठाकरेंमुळेच उद्धव कार्याध्यक्ष; संदीप देशपांडेंचा राऊतांवर प्रतिवार

मुंबई, दि. ३० – शिवसेना व महाराष्ट्र नव निर्माण सेना यांच्यात चांगलीच जुंपली आहे. रोज एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार, संपादक संजय राऊत यांनी बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे हे बाळासाहेबांसोबत महाराष्ट्रभर पक्षाच्या कामासाठी फिरत होते त्या वेळी उद्धव ठाकरे हे फोटो काढण्यात मश्गुल होते. राज ठाकरेंच्या विनंतीमुळेच बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव यांना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नेमले हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये.

संजय राऊत यांनी मनसेवर नव हिंदू म्हणून टीका केली होती, त्यावर राज ठाकरेंनी सभा घेतल्यानंतर शिवसेनेला आठवत आहेत की आपण हिंदू आहोत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंना सुनावले आहे. राज ठाकरे यांची बहुचर्चित सभा उद्या औरंगाबाद येथे होणार आहे. या सभेत ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सध्या राज ठाकरेंकडून कौतुक केले जात आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, पूर्वी याच लोकांकडून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली जात होती. भगवे कपडे घालून ते नौटंकी करत असल्याचे ते म्हणत होते. मात्र, आता या लोकांनी आपली भूमिका बदलली आहे. ते आता युपीत चालले आहेत. त्यामुळे योगींना पूर्वी हिणवणाऱ्या या लोकांचे आता युपीत कसे स्वागत होते, हे पाहण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे राऊत म्हणाले.

काही जणांनी आता हिंदुत्वाचं नवं कातड पांघरले आहे. त्यांचे ते भाड्याचे कातडे आहे. पण शिवसेनेचे हिंदुत्व भाड्याचे नाही. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून आम्ही लढत नाही. शिवसेना समोरून छातीवर वार करणारा पक्ष आहे. आम्ही पाठीमागून वार करत नाही. शिवसेनेचे दोन घाव बसले तर तुम्ही पाणी मागणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.

शिवसेनेला डिवचण्याचे बरेच जण प्रयत्न करत आहेत. हनुमान चालिसावरून वातावरण पेटवले जात आहे. आमच्या हिंदुत्वावर सवाल केला जात आहे. मात्र, आतापर्यंत सत्तेत असल्यामुळे आम्ही संयम बाळगला. संयम बाळगणे संयुक्तिकही होते. पण आता पाणी डोक्यावरून गेल्यामुळे आम्हाला इतरांना बुडवावे लागेल, मग त्यांना गंटागळ्या खाव्या लागतील, असे राऊत यांनी सुनावले.