तब्बल ४ वर्षांनी आशिया चषक स्पर्धा; श्रीलंका होणार यजमान

तब्बल ४ वर्षांनी आशिया चषक स्पर्धा; श्रीलंका होणार यजमान

नवी दिल्ली, दि. १९ मार्च - आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक 2022 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. आशिया कप स्पर्धेचं आयोजनाचा मान हा श्रीलंकेला मिळाला आहे. स्पर्धेतील पहिला सामना 27 ऑगस्ट रोजी होणार असून अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा यंदा 20 ओव्हरची असणार आहे. तर बाद फेरीतील सामन्यांना 20 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आशिया कप स्पर्धेचं दर 2 वर्षानं आयोजन केलं जातं. मात्र कोरोनामुळे 2020 मध्ये या स्पर्धेचं आयोजन रद्द करण्यात आलं. त्यामुळे 2 वर्षांनी पुन्हा या स्पर्धेचं आयोजनस करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सहा संघांच्या या स्पर्धेत आशिया खंडातील पाच संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. हे संघ भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत, तर सहावा संघ क्वालिफायर सामन्यांच्या आधारे निश्चित केला जाईल.

टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 7 वेळा आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 2016 आणि 2018 मध्ये सलग आशिया कप जिंकला होता.  त्यामुळे यावेळेस टीम इंडियाचं हॅट्रिकसह आठव्यांदा आशिया कप जिंकण्याचं मानस असणार आहे.

आतापर्यंत ही स्पर्धा 14 वेळा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 1984 मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती. भारतीय संघ 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये चॅम्पियन ठरला आहे. त्याचवेळी श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008 आणि 2014 मध्ये विजेतेपद पटकावले होते. पाकिस्तानने 2000 आणि 2012 मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.