गंभीर दुखापतीमुळे टीम इंडियातील चार स्टार खेळाडूंचा साऊथ आफ्रिका दौरा रद्द 

गंभीर दुखापतीमुळे टीम इंडियातील चार स्टार खेळाडूंचा साऊथ आफ्रिका दौरा रद्द 
मुंबई -
न्यूझीलंडविरुद्धची टी-20 आणि कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून त्यातील पहिली कसोटी जोहान्सबर्ग येथे होणार आहे. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिकादेखील खेळवली जाणार आहे. लवकरच या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा होणार आहे, मात्र अनेक खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्याला विलंब होत आहे. टीम इंडियाचे चार प्रमुख खेळाडू जखमी झाले असून त्यांना बरे होण्यास वेळ लागणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हे खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकणार नाहीत.

दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये इशांत शर्मा, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि शुभमन गिल या खेळाडूंची नावे आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या चौघांना पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी काही महिने लागू शकतात. रवींद्र जाडेजा आणि इशांत दुखापतीमुळे मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकले नव्हते. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, लिगामेंटच्या दुखापतीमुळे जडेजा त्रस्त आहे, दुसरीकडे, इशांतचे बोट डिसलोकेट झाले आहे.

टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या इशांतपेक्षा रवींद्र जडेजाची दुखापत ही वाईट बातमी आहे. कारण टीम इंडियाकडे इशांतचा पर्याय म्हणून खेळाडू आहेत पण जडेजाच्या जागी चांगला पर्याय नाही. कारण डावखुरा फिरकीपटू आणि फलंदाज अक्षर पटेलही फिट नाही. त्याला स्ट्रेस फ्रॅक्चरचा त्रास आहे. त्यामुळे या दोघांना पर्याय उपलब्ध नसल्याची समस्या आता निवडकर्त्यांसमोर आहे. आर अश्विन दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताचा मुख्य फिरकी गोलंदाज असेल. द. आफ्रिकेतील मैदानांवर खेळताना दोन फिरकीपटूंची आवश्यकता नसली तरी जाडेजा आणि अक्षर यांनी फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे.

इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे की, जडेजाच्या लिगामेंटची इंज्युरी बरी होण्यासाठी काही महिने लागतील. जर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली तर तो आयपीएलच्या आसपासच बरा होऊ शकेल. अक्षर पटेलबलद्दल सांगायचे झाल्यास, प्राथमिक तपास अहवालानुसार त्याला फिट होण्यासाठी किमान सहा आठवडे (दीड महिना) लागतील. मेडिकल टीम सल्लामसलत केल्यानंतरच दक्षिण आफ्रिकेला जायचे की नाही याचा निर्णय निवडकर्ते घेतील. अक्षर आणि जडेजा हे दोघेही उपलब्ध नसल्यास शाहबाज नदीम आणि सौरभ कुमार यांची निवड केली जाऊ शकते, असे मानले जात आहे. सौरभ कुमार सध्या भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.

शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेत पाठवण्याबाबत निवड समितीही ठाम नसल्याचे समजते. गिलच्या पायाला झालेल्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याला ही दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मायदेशी परतावे लागले होते. याशिवाय मुंबई कसोटीत त्याच्या डाव्या हातालाही दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानात उतरला नाही. इशांत शर्माबद्दल सांगायचे झाल्यास, त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. यातून सावरायला त्याला वेळ लागेल.