महाराष्ट्र अभी बाकी म्हणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है - शरद पवार पवारांचे प्रतिआव्हान

महाराष्ट्र अभी बाकी म्हणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है - शरद पवार पवारांचे प्रतिआव्हान

मुंबई, दि. 10 मार्च -  देशातील चार राज्यांत भाजपची सत्ता आल्यानं महाराष्ट्रातूनही आता जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. निवडणूक निकालानंतर राज्यातले भाजप नेतेही ये तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, चा नारा देऊ लागले आहेत. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी त्यांना त्याच शब्दात उत्तर दिले आहे. महाराष्ट्र अभी बाकी म्हणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है! अशा शब्दात शरद पवारांनी महाराष्ट्र भाजपशी लढायला तयार असल्याचे सांगितले आहे. 

पवार पुढे म्हणाले की, आगामी अधिवेशनाच्या काळात आम्ही दिल्लीत असू त्यावेळी इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करता येईल. यातून मार्ग काढता येईल. आगामी काळात एकत्र येण्याबाबत गांभीर्याने विचार करता येईल, असेही पवार आजच्या निकालानंतर म्हणाले आहेत.पंजाबमधील निकालाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, देशात एवढं मोठं शेतकरी आंदोलन झालं. त्यात सर्वात जास्त शेतकरी हे पंजाबमधील होते. काही लोकांनी तिथल्या शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटलं. देशासाठी बलिदान देणाऱ्यांमध्ये शीख बांधवाचा सहभाग मोठा आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांविषयी अशी पाऊलं उचलली जाऊ नयेत. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ठोस पाऊलं उचलनं गरजेचं आहे. त्यामुळे पंजाबच्या शेतकऱ्यांनी आम आदमी पार्टीला कौल दिला असावा, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. 

1977 लाही अशीच परिस्थिती आली होती. सर्वच राज्यात काँग्रेस हारली होती. तेव्हा अनेक लोक बोलले की काँग्रेस संपली आहे. मात्र काँग्रेस पुन्हा फॉर्ममध्ये आली. राजकारणात पक्ष कधी ना कधी हारतो. त्यामुळे फार निराश होण्याची गरज नाही. असेही शरद पवार या वेळी म्हणाले.