ईडीकडून नवाब मलिक यांना अटक

ईडीकडून नवाब मलिक यांना अटक
  • मुंबईतील ईडीच्या कार्यालया बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते जमा, तणावाचे वातावरण
  • तपास यंत्रणा झाल्या कमळीच्या सालगडी - खासदार अमोल कोल्हे
  • 'ईडीला सरकार बनवायची घाई असेल तर, शिवाजी पार्कात या!' - यशोमती ठाकूर

 

मुंबई, दि. 23 - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडी (सक्त वसूली संचालन) कडून अटक करण्यात आली आहे. पहाटे पासूनच त्यांची चौकशी करण्यात येत होती. अखेर 8 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अंडरवर्ल्ड कडून त्यांनी जमीन खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यापूर्वी चार दिवसांपूर्वी कुख्यात गुंड  दाऊद इब्राहीम याची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी सुरु होती.

 

नवाब मलिक यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांची चौकशी सुरु असलेल्या ईडीच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यास या भागात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर ईडीच्या कार्यालयाबाहेर हालचालींना वेग आला आहे. ईडीच्या कार्यालयाबाहेर गाड्यांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच या परिसरात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या भागातील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. ईडीच्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्तेही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे रूप प्राप्त झाले आहे.

 

नवाब मलिक यांच्यावरील कारवाईने महाराष्ट्र विकास आघाडीतील तीन्ही पक्षांचे नेते संतप्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या कवितेतून तीव्र भावना मांडली आहे. त्यांची कवीता अशी -

सत्तेच्या माडीसाठी । ईडीची शिडी ।।

विनाकारण मारी । धाडीवर धाडी ।।

सलते सत्तेवरील महा आघाडी

म्हणून कमळाबाई लाविते काडी

तपासयंत्रणा झाल्या कमळीच्या सालगडी

पाकळ्यांमध्ये नाहीत का काहीच भानगडी ?

पण लक्षात ठेवा, पुरून उरेल सर्वांना

रांगडा राष्ट्रवादी गडी

 

नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचे आश्चर्य वाटत नाही. कारण केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जाते अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

 

मी केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल करणारच! या सगळ्याची किंमत मोजायला तयार अशी प्रतिक्रिया नवाब मलिकांवरील कारवाईनंतर संजय राऊत यांनी दिली आहे.

 

ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. या अटकेचा उत्तर प्रदेशमधील निवडणुकांशी संबंध असल्याचा त्यांनी आरोप केल आहे.