पिंपरी-चिंचवड महापालिका व्यावसायिक कबड्डी संघाला महासभेची मान्यता

पिंपरी-चिंचवड महापालिका व्यावसायिक कबड्डी संघाला महासभेची मान्यता
पिंपरी -
भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी गेल्या दीड वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा व्यावसायिक कबड्डी संघ असावा यासाठी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व्यावसायिक कबड्डी संघाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. 
पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक गुणवंत कबड्डीपटूंना पुणे, मुंबईसह परराज्यातील कंपन्यांकडे नोकरीसाठी व्यावसायिक संघात स्थान मिळवावे लागत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक खेळाडुंना संधी मिळण्यासाठी व्यावसायिक संघ तयार करावा, असा प्रस्ताव ठेवला होता. क्रीडा समिती सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी या प्रस्तावावर सूचक म्हणून, तर नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे.

‘सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार’ची घोषणा
महापालिका सर्वसाधार सभेत मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार, आगामी काळात पिंपरी-चिंचवड महापालिका ‘सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार’ची घोषणा करणार आहे. त्याअंतर्गत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रतिभावान खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि मार्गदर्शकांना गौरविण्यात येणार आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय खेळाडू पुरस्कार धोरणही तयार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या अ,ब,क वर्ग व्यायामशाळांबाबतही धोरण तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे, मुले आणि मुलांसाठी स्वतंत्र व्यावसायिक कबड्डी संघ तयार करण्यात येणार असून, त्याचे धोरण ठरविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना सोपवण्यात आले आहेत.