पोलिसांच्या कामगिरीवर माझा ठाम विश्वास - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पोलिसांच्या कामगिरीवर माझा ठाम विश्वास - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

        पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  पोलीस कुठल्याही गुन्ह्याचा शोध 24 तासात लावतात, यावर माझा ठाम विश्वास आहे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. त्याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयुक्त चौबे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले. हे पदक खूप मोठे आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पोलिसांना चांगलं म्हणणं, त्यांचा सन्मान करणं हे फार रेअर असतं. ते आपल्याला वाढवायला हवं. अभिनंदन आणि शुभेच्छांमुळे पोलिसांना काम करण्याला उत्साह येतो.

पोलीस कुठल्याही गुन्ह्याचा शोध 24 तासात लावतात, यावर माझा ठाम विश्वास आहे. पुणे शहरात मागील काही काळात आतंकवाद्याची लिंक सापडली. त्याची धागेदोरे फार लांबपर्यंत जात आहेत. पुणे, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सक्षमीकरणासाठी 40 कोटी जिल्हा नियोजन निधी मधून तर 60 कोटी रुपये इतर माध्यमातून दिले जाणार आहेत. पोलीस चौक्यांचे सक्षमीकरणासाठी आणखी काम करणे गरजचे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

अंमली पदार्थ तरुणाईला खात आहेत. त्याला कुठलेही अभय देऊ नका. शक्य त्या पर्यायाचा अवलंब करा. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक आणखी सक्षम करा, असा सल्ला देखील पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, "पोलीस आयुक्तांना जाहीर झालेल्या राष्ट्रपती पोलीस पदकाबद्दल त्यांचे अभिनंदन. चौबे यांनी 26 वर्ष केलेल्या सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात येणार आहे. मी माझ्या कारकिर्दीत अनेक पोलीस अधिकारी पाहिले. पण खऱ्या अर्थाने त्या पदाला न्याय देण्याचे काम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे. अनेकदा राजकीय मंडळींच्या दबावामुळे पोलिसांवर मर्यादा येतात. गुन्हेगाराला वेळेत शासन न झाल्याने हवी ती जरब बसत नाही. लोकहितासाठी जर प्रत्येक राजकीय नेत्याने काम केले तर पोलिसांना वेगळे काम करण्याची गरज राहणार नाही. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे काम खूप चांगले आहे. शहरासोबत गुन्हेगारी वाढत आहे. ती कमी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत."

आमदार उमा खापरे म्हणाल्या, "शहरातील प्रत्येक नागरिक पोलिसांकडे आपले प्रश्न घेऊन जाऊ शकतो. तसे वातावरण शहरात निर्माण झाले आहे. महिलांच्या संरक्षणात पिंपरी चिंचवड पोलीस यशस्वी ठरले आहेत. यापुढेही महिलांची सुरक्षा पोलिसांनी अबाधित ठेवावी. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना जाहीर झालेल्या राष्ट्रपती पोलीस पदकासाठी शुभेच्छा."