मराठवाड्यातील मराठा आरक्षणाला राज्य शासनाकडून गती 

मराठवाड्यातील मराठा आरक्षणाला राज्य शासनाकडून गती 
 
   पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  आंध्र  प्रदेशच्या धर्तीवर मराठवाड्यातील मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, यासाठी छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांचा पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री व प्रशासनाने मराठा आरक्षणाला गती दिलेली असून, नियुक्त समिती आपला अहवाल येत्या 30 ऑगस्टपर्यंत सादर करणार आहे, अशी माहिती छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी दिली.
         जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की किशोर चव्हाण यांनी 31 जुलै रोजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना निवेदनासह अनेक पुरावे देऊन सविस्तर चर्चा केली. या संदर्भात नेमलेल्या समितीने आपला अहवाल शासनास लवकर सादर करावा, अशी मागणी केली असता विभागीय आयुक्त आर्दड यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत तपासणी करून निर्णय घेण्यात येईल. यासाठी विधी व न्याय व इतर मागास बहुजन कल्याण व सामान्य प्रशासनाच्या विभागाच्या सचिवांना तसेच मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गती दिली असल्याचे दिसत आहे.
            दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने मराठवाड्यातील हक्काच्या आरक्षणावर निर्णय घ्यावा, यासाठी मराठवाड्यातील मराठा समाज जागृतीसाठी येत्या ५ सप्टेंबरपासून मराठवाड्यातील सर्व जिल्हयात जनजागृती दौरा सुरू करण्यात येणार आहे. या दौऱ्यात  मराठवाड्यातील आरक्षणाची मागणी व प्रशासकीय पाठपुरावा करणारे किशोर चव्हाण, छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांच्यासह संपर्कप्रमुख सचिन गवांडे, अतुल निकम, शुभम गवळी, विनायक तंबी, गणेश कोतवाल सहभागी होणार आहेत.             या दौऱ्यात मराठवाड्यातील आरक्षणावर प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा, मराठा संघटना सर्व क्षेत्रातील मराठा समाजाची व्यापक बैठक घेऊन जनजागृती करणार आहे.