बेटी धनाची पेटी - परिवर्तनाची नांदी

बेटी धनाची पेटी - परिवर्तनाची नांदी

स्वतःला सिद्ध करता आले पाहिजे - डॉ. भारती चव्हाण (मानिनी फौंडेशन)

ग्रामीण भागात झालेल्या एका बैठकीत एक महिला अभिमानाने सांगत होती की, मला तीन मुली आहेत आणि मी त्यांना मुलं समजूनच वाढवते तथापि, याच बैठकीत एक महिला सासू झाल्यावर मुलगीच झाली पाहिजे असे म्हणणाऱ्या महिलांचा निषेध करते. परंतु शेवटी सर्व स्त्रीभ्रूणहत्याविरोधी सामूहिक शपथ घेतात. तेव्हा उर अभिमानाने भरून येतो. समाजपरिवर्तनाची आणि महिला सक्षमीकरणाची हीच खरी नांदी आहे असे वाटते. असेच पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तीन बहिणी महाविद्यालयीन शिक्षण घेत ज्यूस सेंटर चालवतात. अत्यंत नम्र आणि प्रोफेशनली जीन्स, टी-शर्ट घातलेल्या या मुली सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सोबत स्पोर्ट्स आणि कराटेही शिकतात. त्यांच्या आईसोबत बोलताना "माझी ही तिन्ही मुलंच आहेत" अशी ओळख करून देणाऱ्या आईचा शब्द काळजात कोरला जातो.

पाटण तालुक्यातील डोंगरावर असलेले दुर्गम भागातील गाव. तिथून शाळा, कॉलेज, नोकरीवर जाण्यासाठी सात-आठ किलोमीटर डोंगर उतरून एस. टी. ने जावे लागते. अशा गावातील मुलीची नौदलात अधिकारी पदासाठी निवड होते, तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करावासा वाटतो.

हे परिवर्तन एका दिवसात किंवा वर्षात झाले नसून त्यासाठी अनेक दशके वाट पहावी लागली. दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावरील महिला रस्त्याने पायी एकटी जाताना दिसते म्हणून तिला लिफ्ट दिल्यावर गप्पामधे कळले की, बारा कि. मी. पायपीट करून एस. टी. पकडून आणखी तीन तास प्रवास करून तालुक्यात आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलीला भेटायला आणि शाळेच्या मासिक बैठकीला चालली आहे आणि अशीच रात्री घरी परत येणार आहे. तेव्हा आपसूकच या माऊलीच्या दूरदृष्टीपणाला दंडवत घालावासा वाटला.

...आणि आठवल्या शिवरायांना घडवणाऱ्या आणि स्वराज्याचा पाया घालायला लावणाऱ्या महाराणी जिजाऊ. मुघलांबरोबर लढाया करून करवीर संस्थांनचे रक्षण करणाऱ्या महाराणी ताराबाई, पतीच्या निधनानंतर राज्यकारभार सांभाळताना पोटाशी झोळीमध्ये लहानग्याला बांधून लढाया करणाऱ्या महाराणी लक्ष्मीबाई, देशभर भ्रमंती करून हिंदू देवालायांना विकसित करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, शेणा-चिखलाचे गोळे अंगावर झेलत मुलींना घरोघरी जाऊन शिक्षण देणाऱ्या सावित्रीबाई फुले, फातिमा सैयद, डॉ. आनंदीबाई जोशी , भारताच्या संसदेतील पोलादी स्त्री नव्हे, तर पोलादी पुरुष म्हणून परदेशीं राज्याकर्त्यांनी संबोधलेल्या इंदिराजी गांधी, प्रशासकीय सेवेत पुरुषांच्या बरोबरीने स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटविणाऱ्या किरण बेदी, जगभर सर्वसामान्यांना सेवा देणाऱ्या मदर तेरेसा, कवितेच्या माध्यमातून देशसेवा आणि क्रांती घडविणाऱ्या सरोजिनी नायडू आणि यासारख्या असंख्य कर्तबगार स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने पुरुषार्थ गाजवला आहे. त्यामुळे पुरुषार्थ म्हणजे पुरुषांनी केलेले कार्य असा अर्थ नसून ज्या स्त्रियांनी विशेष कर्तबगारी केलेली आहे, स्वतःच्या हिंमतीवर कर्तृत्व  उभे केले आहे, त्या स्त्रियांसाठी देखील "पुरुषार्थ" हा शब्द लागू होतो.

या सर्व स्त्रिया पुरुषप्रधान संस्कृतीतीलच आहेत, त्या काळच्या अत्यंत कर्मठ समाजामध्ये अनेक सामाजिक बंधने, यातना, आणि संकटाचा सामना करत त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आणि म्हणून समाजाने त्यांना स्वीकारले हे वास्तव आहे.

समाजमान्यतेसाठी स्वतःला सिद्ध करता आले पाहिजे हे प्रामुख्याने महिलांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

बुरसटलेल्या सामाजिक मानसिकतेमुळे पूर्वीच्या काळी महिलांनी शिक्षण घेणे मान्य नव्हते, शिकलेल्या महिलांनी शुद्ध  बोलणेसुद्धा चालत नव्हते. स्त्रियांनी लिहायला वाचायला शिकायचे नाही, घरात मोठयाने बोलायचे नाही, घराबाहेर जायचे नाही असे वातावरण होते.

मग त्यांनी करायचे काय? तर शिक्षण, ज्ञान आणि व्यवहार या व्यतिरिक्त जी शारीरिक श्रमांची कामे असतील ती करायची हा दंडक. वधूपरीक्षा करताना वरपक्षातील जेष्ठ महिला मुलीच्या कानाचा चाप गच्च दाबून धरत असे. मुलीने हूं की चू केले नाही. तर मुलगी पसंत होत असे. मूक आणि सोशिक स्त्री ही त्याकाळची समाजमान्य आदर्श स्त्रीची प्रतिमा होती.

कोणी म्हणेल की, ती जुनी परिस्थिती होती. आता महिलांचे जगही बदललंय. महिला आता शिकू लागलेल्या आहेत, विविध विषयावर बोलायला लागलेल्या आहेत, सातासमुद्रपार जाऊन स्वतःच्या करियरबद्दल जागरूक झालेल्या आहेत. ही सकारात्मक बाब आहे, परंतु देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण किती आहे? आजही महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, बलात्काराची आकडेवारी काय सांगते? सामाजिक सुरक्षेबरोबरच कौटुंबिक सुरक्षाही धोक्यात आलेली आहे. असुरक्षेची तलवार मानेवर लटकत असतानाही त्या स्वतःला सिद्ध करायला निघालेल्या आहेत, हे परिवर्तन अपेक्षित आहे. परंतु त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. घटस्फ़ोटांनंतर स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढताना शारीरिक मानसिक कसरत करावी लागत आहे.

या परिस्थितीतही तिला पुढे जायचे आहे. हे उल्लेखनीय आहे. त्यासाठी मुलींना शिक्षण देणे, तिला आत्मनिर्भर बनविणे, धैर्य देणे आणि तिच्यातला आत्मविश्वास जागृत करून तिला संस्कारक्षम बनविणे हे क्रमनिहाय आहे.

मुलगा, मुलगी समानता आणण्यासाठी सरकारने शैक्षणिक बदलांबरोबर मालमत्तेत समान हिस्साचा कायदा केला. परंतु पुरुषांची मानसिकता तयार नसल्यामुळे कुटुंबव्यवस्थेमध्ये दुरावा येऊ लागला. मुलींना अधिकाराबरोबर जबाबदारीही देण्यात आली पाहिजे. असाही कायदा संमत होणे गरजेचे आहे. तेव्हा हा कायदा स्वीकारण्याची मानसिकता तयार होईल. आजकाल अनेक ठिकाणी मुली आई वडिलांची काळजी घेताना दिसतात, लग्नापूर्वी त्यांच्यावर असलेल्या आई वडिलांच्या जबाबदारीची जाणीव देऊन लग्न करतात, उत्पन्नाचा काही भाग आई वडिलांना देणार असे ठामपणे सांगतात. अंत्यसंस्कार, पिंडदान, श्राद्ध यासारखे धार्मिक विधी पार पाडतात. हे सर्व परिवर्तनच म्हणावे लागेल. या परिवर्तनामुळेच मुलींचा जन्मदर वाढतो आहे. स्त्रीभ्रूणहत्याविरोधात महिला स्वतः जागरूक होत आहेत. मुलींच्या जन्माचे स्वागत होताना दिसत आहे. याचे महिलादिनाच्या निमित्त खऱ्या अर्थाने स्वागत करून महिला दिन साजरा करू या.