मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळच्या सुमारास दादरमधील शिवाजी पार्क येथे चार हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला.

मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना हल्ला झाला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला दुखापत झाली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर सध्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आहेत. त्यांना मारहाणीत गंभीर दुखापत झाली आहे का, हे तपासण्यासाठी त्यांचा एक्स-रे काढण्यात आला आहे. सध्या संदीप देशपांडे यांची प्रकृती स्थिर आहे.

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केलेले हल्लेखोर चेहऱ्याला मास्क लावू आलेले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणांवरुन झाला याबाबत पोलिस तपासातच अधिक माहिती समोर येईल.

संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यानंतर संदीप देशपांडे यांना भेटण्यासाठी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हिंदुजा रुग्णालयात मोठी गर्दी केली. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही काहीवेळापूर्वीच हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत. मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि अन्य कार्यकर्ते सकाळपासूनच याठिकाणी आहेत. तर भाजप आमदार नितेश राणे हेदेखील हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना आरामासाठी घरी सोडण्यात आलं. यावेळी त्यांनी या हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, “आम्ही कुणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही. असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही कुणालाही भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत हे सर्वांना माहिती आहे.” “अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही. मी माझं काम करत राहील. ज्यांना वाटतं मी या हल्ल्याने घाबरेल त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की, याने मी घाबरणार नाही,” असंही संदीप देशपांडेंनी नमूद केलं.

संदीप देशपांडे यांना कोणतेही संरक्षण नाही. याआधी त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते. पण त्यांनी ते नाकारले होते. आजचा हल्ला पूर्वनियोजित कट तर नव्हे ना अशाही शंका उपस्थित केल्या जात आहेत. हल्लेखोरांबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.