पीसीसीओईआर रावेत महाविद्यालाचे "तिफन" स्पर्धेत घवघवीत यश

पीसीसीओईआर रावेत महाविद्यालाचे "तिफन" स्पर्धेत घवघवीत यश
पीसीसीओईआर रावेत महाविद्यालाचे "तिफन" स्पर्धेत घवघवीत यश

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीयर्स इंडिया (एसएई) या नामांकित संस्थेने घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील 'तिफन' या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाने (पीसीसीओईआर) सर्वोत्कृष्ट उत्पादकता श्रेणी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या वर्षीच्या स्पर्धेत देशभरातील ४० पेक्षा जास्त अभियांत्रिकी व कृषी महाविद्यालयांना मागे टाकत सर्वोत्कुष्ट उत्पादकता या श्रेणीत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला पीसीसीओईआरने मिळवला आहे. या कामगिरीबद्दल पीसीसीओईआरच्या "सोनिक डिगर" या विजयी संघास सन्मानचिन्ह आणि रोख २५,००० रुपये बक्षीस देऊन गौरवण्यात आले. अभिषेक पाटील याने संघाचे नेतृत्व केले. विजयी संघाचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पदमाताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी अभिनंदन केले.

या विषयी अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले की, बाहा, सुप्रा या गाजलेल्या स्पर्धा बरोबरच एसएई इंडिया ही संस्था जॉन्डीयर, अन्सिस, महिंद्र अँड महिंद्र व बीकेटी टायर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी "तिफण" ही कृषी क्षेत्राला वाहिलेली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात येते. या वर्षीची स्पर्धा ७ मे रोजी घेण्यात आली तिचा ऑनलाईन निकाल ११ जून रोजी जाहीर करण्यात आला. भारत हा कृषिप्रधान देश असून नवीन तंत्रज्ञानाचा, संशोधनाचा कृषीक्षेत्रास लाभ व्हावा, अभियांत्रिकी व इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राची ओळख व्हावी. शेतकरी आणि तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन समृद्धी साधत देशाचा विकास करावा या हेतूने हा उपक्रम राबवला जातो.

अलीकडच्या काळात शेती व्यवसायात थोड्याफार प्रमाणात तंत्रज्ञान वापरले जात असले तरी कृषी उत्पादनाची काढणी करताना अजूनही मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पद्धतच वापरली जाते. म्हणूनच स्वयंचलित कांदा काढणीयंत्र (ओनियन हारवेस्टर) ही वर्ष २०२२ च्या तिफण स्पर्धेची संकल्पना होती. या मध्ये पीसीसीओईआरच्या यंत्राने ९५ टक्क्यांहून अधिक उत्पादकता नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. कांद्याबरोबर बटाटा, रताळे, भुईमूग आदी पिकांची काढणी करण्यासाठी या यंत्राचा उपयोग होऊ शकतो हे या यंत्राचे वैशिष्ट्य आहे. सोनिक डिगर संघामध्ये पीसीसीओईआरच्या यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे तिसऱ्या व चौथ्या वर्षाचे एकवीस विद्यार्थी सहभागी होते. प्रा. अच्युत खरे यांनी संघाचे मुख्य समन्वयक म्हणून काम पहिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, विभागप्रमुख डॉ. रमेश राठोड, कार्यशाळा अधीक्षक प्रा. नंदकुमार वेळे आणि प्रा. कवीदास मते यांनी यंत्र निर्मितीसाठी मार्गदर्शन केले.