मुंबई, दि. 28 मे - संभाजी छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता भाजपने राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपला उमेदवार उभा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपने तिसरा उमेदवार उतरवल्यास घोडेबाजार रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप नेमका कोणता उमेदवार देणार यावर पुढचे समीकरण अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे. भाजपाने तिसरा उमेदवार जर दिला आणि घोडेबाजार झाला तर भाजप निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यसभेची निवडणूक अतिरिक्त मतांवर होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत याआधीच सांगितले. शिवसेना जो उमेदवार उभा करेल, त्याच्या पाठिशी आमची मतं असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरु आहे. महाविकास आघाडीचं सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे शिवसेनेचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये खदखद राहणार नाही, अशा शब्दात खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना इशारा दिला. तर निधीवाटपावरुन शिवसेना आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही जाहीर व्यासपीठावरुन शिवसेना नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. याचा फटका मविआला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येणारा काळच सांगेल भाजप की महाविकास आघाडी बाजी मारेल.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्ष्या दिसू लागली आहे. असे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी याआधी केले होते. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी जर भाजपने घोडेबाजार केला तर ते निवडून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
तिसरा उमेदवार देण्याबाबत खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपने अजूनही तिसरा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला नाही. भाजप कोणत्याही निवडणुकीत पराभूत होण्यासाठी उमेदवार उभा करत नाही. आम्हाला ज्या वेळी वाटेल तेव्हा आम्ही उमेदवार उभा करण्याबाबतचा विचार करू. आमच्या सहयोगींची मिळून आमच्याकडे आता ३१ मते आहेत. रमेश लटके यांचे निधन झाले. त्यामुळे हा कोटा ४२ वरून ४१ वर येईल. त्या परिस्थितीत आम्हाला १० मतांची गरज भासणार आहे. आमची मार्केटमध्ये पत आहे. घोडाबाजार न करता आमचा उमेदवार विजयी होऊ शकतो. आम्हाला १० मते सहज मिळतील.
३१ मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे लवकरच निर्णय होईल. संसदीय समितीचे मंडळ असते. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतात. या बैठकीवेळी आम्हाला विचारले जाईल. आज आमच्याकडे एकूण ३१ मते आहेत. इतर १० मते आम्हाला मिळतील. देवेंद्र फडणवीस यांचे रिलेशन सर्वांसोबत चांगले आहेत. आम्हाला केंद्राने परवानगी दिली तर आम्ही तिसरी जागा जिंकून दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.