दुसऱ्यांदा परीक्षा देणाऱ्यांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही – आरोग्य मंत्री

दुसऱ्यांदा परीक्षा देणाऱ्यांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही – आरोग्य मंत्री

मुंबई, दि. 25 मे - राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील पदभरती परीक्षांसंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की राज्य मंत्रिमंडळ, मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यांचे मत आहे की पुन्हा परीक्षा घेतल्या जाव्यात. त्या कोणत्या मार्गाने घेता येतील याबाबत कॅबिनेटद्वारे काही निर्णय घेण्यात आले आहेत. तेव्हा त्याच मार्गाने जायचं की जिल्हा पातळीवर परीक्षा घ्यायच्या, याबाबत विचार सुरू आहे. सामान्य प्रशासन विभागाने परीक्षा घेण्यासंदर्भातील नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार प्रादेशिक, जिल्हा व राज्य स्तरावर परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे परीक्षा नक्की कशा घेण्यात येतील याची सविस्तर माहिती आम्ही लवकरच देऊ, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्य मंत्रिमंडळामध्येही हीच चर्चा आहे की, परीक्षा पुन्हा घेतल्या जाव्यात. यासंबंधीचा शासन निर्णय येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येईल आणि कोणत्या पद्धतीने परीक्षा घेण्यात येतील हे लोकांना कळवण्यात येईल, असे ते म्हणाले.

यात दुसऱ्यांदा परीक्षा देणाऱ्यांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. त्याचबरोबर नियमानुसार एखाद्याचे वय बसत असेल तर त्याबाबतही नियमात काही शिथिलता देता येऊ शकते का याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे मत घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे ना. राजेश टोपे यांनी सांगितले.