पोटनिवडणुकांमध्ये जनतेने भाजपला नाकारले - अजित गव्हाणे

पोटनिवडणुकांमध्ये जनतेने भाजपला नाकारले - अजित गव्हाणे

लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत पराभव

पिंपरी-चिंचवड, दि. १६ एप्रिल - काही दिवसांपूर्वी चार राज्यांत विजय मिळविणार्‍या भाजपला देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये जनतेने नाकारले आहे. ही भाजपच्या पराभवाची सुरूवात असून, महागाई, बेरोजगारी सर्वसामान्य जनतेच्या शिरावर लादणार्‍या भाजपला येत्या महापालिका निवडणुकीत जनताच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज (शनिवारी) व्यक्त केला.

चार राज्यातील रिक्त झालेल्या एका लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचा निकाल शनिवारी जाहीर झाला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर अजित गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून, भाजपवर जोरदार टीका केली आहे. गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि छत्तीसगडमध्ये एका लोकसभेची आणि चार विधानसभा निवडणुकीची पोटनिवडणूक नुकतीच झाली होती. त्याचे निकाल जाहीर झाले आहेत. या सर्वच्या सर्व पोटनिवडणुकांमध्ये भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. भावनिक, धर्मांध मुद्दे उपस्थित करून तसेच जाती-धर्मामध्ये वाद निर्माण करून आपल्या सत्तेची पोळी भाजणार्‍या भाजपला पोटनिवडणुकीत धडा शिकविला आहे.

कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत 19 हजारांच्या मताधिक्याने भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. या ठिकाणी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन भाजपने प्रचार केला, मात्र सूज्ञ जनतेने त्यांना नाकारले. अशीच स्थिती पश्चिम बंगालमधील असून, येथील लोकसभेची एका आणि विधानसभेच्या एका जागेवर तृणमुल काँग्रेसचा विजय झाला आहे. भाजपला अत्यंत नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बिहार आणि छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार असताना या ठिकाणच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील निवडणुका या विरोधकांनी जिंकल्या असून, भाजपला पराभवाची धूळ चारली आहे, त्यामुळे भाजपच्या पराभवाला सुरुवात झाल्याचेच स्पष्ट झाले आहे.

सध्या देशासमोर अनेक प्रश्न असताना भाजपनेते धर्माच्या नावाखाली विखारी प्रचार करत आहेत. सर्वसामान्यांच्या महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नांचे त्यांना कोणतेही सोयर-सुतक राहिलेले नाही. रामाच्या आणि हनुमानाच्या नावाचा गैरवापर करून ते हिंदु-मुस्लिम असे दंगे पेटवू पहात आहेत. मनसेसारख्या पक्षाच्या नेत्यांना सुपारी देऊन महाराष्ट्रात दंगली घडविण्याचा कट या मंडळींनी रचला आहे. मात्र जनता आता सुज्ञ आणि विचारी झालेली आहे. त्यामुळे कितीही किळसवाणा प्रचार केला तरी भाजपला जनता आता नाकारू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेनेही आता आणखी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. येणार्‍या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपकडून धर्मांध प्रचार होण्याची शक्यता असल्याने जाती धर्मातील शांतता राखण्याची आता आपल्यावर जबाबदारी आली आहे. त्यामुळे या जातीय शक्तींना सत्तेपासून दूर राहण्यासाठी आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जपणार्‍या पक्षांना प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहनही गव्हाणे यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.