शहर भाजपमध्ये राजकीय भूकंप ; नगरसेवक रवी लांडगे यांचा पक्षाला ‘जय श्रीराम’

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शहर भाजपमध्ये राजकीय भूकंप ;  नगरसेवक रवी लांडगे यांचा पक्षाला ‘जय श्रीराम’

पिपरी-चिंचवड, दि. 5 मार्च - सन 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा श्रीगणेशा करणारे व बिनविरोध विजयी झालेले एकमेव नगरसेवक रवी लांडगे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देत पक्षाला ‘जय श्रीराम’ केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर भाजपामध्ये राजकीय भूकंप झाला असून नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पिंपरी-चिंचवड दौऱ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घडामोडीमुळे भाजपामध्ये खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाच्या जडणघडणीमध्ये ज्या स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांनी सिंहाचा वाटा उचलला त्यांचे रवी लांडगे हे पुतणे आहेत. रवि लांडगे यांनी आपल्या राजीनामापत्रात शहर भाजपातील नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले असून त्यामुळे पक्षाला हादरे बसण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रवी लांडगे यांनी पक्षाला पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, माझे वडील दिवंगत बाबासाहेब लांडगे आणि चुलते दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्याकडून प्रेरणा घेऊन लहानपणापासूनच भारतीय जनता पक्षात काम करायला सुरूवात केली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप रूजवण्यासाठी माझे वडील आणि चुलते या दोघांनीही फार कष्ट घेतले आहेत. त्यांचे हे कष्ट मी लहानपणी जवळून पाहिले आणि अनुभवले आहे. तेव्हापासूनच माझ्यावर भाजपचे संस्कार रुजले. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा राजकीय जन्म हा भाजपमधूनच झालेला आहे. मी पक्षात सक्रिय झाल्यापासून पूर्ण समर्पणाने काम केले. पक्षाशी कधी गद्दारी केली नाही. भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने काम केले. पक्षाच्या जुन्या निष्ठावंतांना ताकद देण्याबरोबरच नवीन कार्यकर्त्यांनाही सोबत घेतले. पक्षहित लक्षात घेऊन नवीन आणि जुना असा कधीच भेदभाव केला नाही.

महापालिकेच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रत्येक विकासकामांत भ्रष्टाचार आणि फक्त भ्रष्टाचारच झालेला आहे. प्रत्येक कामांत रिंग करून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना बळ दिले गेले आहे. चिखलीतील संतपीठ असो की नदी सुधार प्रकल्प असो की भोसरी उड्डाणपुलाखाली अर्बन स्ट्रीट डिझाईन प्रकल्प असो की कचरा डेपोवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प असो एकही काम असे नाही की जे भ्रष्टाचाराविना राबवण्यात आले आहे.

भाजपला भ्रष्टाचाराची ही सर्व देणगी भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिलेली आहे. महेश लांडगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून पक्षाची प्रतिमा भ्रष्टाचारी पक्ष अशी झाली आहे. पक्षाची अशी प्रतिमा मलिन झालेली पाहून माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला फक्त त्याकडे बघत राहणे शक्य होत नाही. मी पक्षात राहूनही अनेकदा आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला कडाडून विरोध केला आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या सत्ताकाळात स्थायी समितीच्या सभापतीला लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने पक्षाची नाचक्की झाली. त्यावरून भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांमध्ये किती भ्रष्टाचार बोकाळला आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे आता पक्षात माझा राजकीय श्वास गुदमरतो आहे.

भ्रष्टाचाराला विरोध करणारे भोसरी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची कटकारस्थाने केली गेली. निष्ठावान कार्यकर्त्यांनी कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता अत्यंत कठीण काळात पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. पण पक्ष जेव्हा महापालिकेत सत्ताधारी बनला त्यावेळी बाहेरून आलेल्यांच्याच हातात नेतृत्त्व दिले. निष्ठावंतांवर लादले गेलेले हे बाहेरचे नेतृत्व स्वार्थी आहे, याचा पक्षाच्या नेत्यांना विसर पडला. पाच वर्ष सतत होणारा अन्याय सहन केल्यानंतर आणि पक्षाचे नेतेही अन्याय करणारांना पाठबळ देत असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टीतील माझ्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे.