मुंबईत रात्री अत्यावश्यक सेवानांच परवानगी; पालकमंत्री शेख यांची माहिती

आज झालेल्या बैठकीत निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय

मुंबईत रात्री अत्यावश्यक सेवानांच परवानगी; पालकमंत्री शेख यांची माहिती

मुंबईतील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत काही कडक निर्णय घेण्यात आले आहेत. याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, मुंबई शहर व महाराष्ट्रात करोना रूग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत काही कठोर निर्णय घेण्यात आलेले आहेत. अगोदपासूनच रात्री जी संचारबंदी सुरू होती, आता त्यात हा बदल असेल की केवळ अत्यावश्यक सेवा असणाऱ्यांनाच रात्री वाहन चालवण्यास परवानगी मिळेल. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

तसेच, रेस्टॉरंट, मॉल्स, दुकानं यांना अगोदरपासूनच रात्री बंदी होती आणि त्यांना केवळ टेक अवे व पार्सलची सुविधा दिली जाईल बाकी बंद असेल. उद्योग जगाताबाबत देखील नियमावली बनवण्यात आलेली आहे. याबाबत विस्तृत माहिती दिली जाणार आहे. मात्र उद्योग जगत कसं चालेल, त्याच्या वेळा काय असतील व तिथे जर करोनामुळे काही परिणाम होत असेल, तर उद्योग चालवणाऱ्यावरच सर्वस्वी जबाबदारी असेल. असे यावेळी अस्लम शेख यांनी स्पष्ट केले.