तब्बल १५ कोटी घेत केएल राहुल बनला ‘या’ संघाचा कॅप्टन !

तब्बल १५ कोटी घेत केएल राहुल बनला ‘या’ संघाचा कॅप्टन !
नवी दिल्ली -
आयपीएल २०२२ मध्ये दोन नवीन संघ लखनऊ आणि अहमदाबादमध्ये पदार्पण करत आहेत. आयपीएल मेगा लिलावापूर्वी लखनऊ फ्रेंचायझीने भारतीय सलामीवीर केएल राहुल, अनकॅप्ड भारतीय खेळाडू रवी बिश्नोई आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मार्कस स्टॉइनिस यांना संघात सामील केले आहे. केएल राहुल लखनऊ संघाचा कर्णधारही असेल. लखनऊ फ्रेंचायझीने केएल राहुलला १५ कोटी रुपयांमध्ये सामील केले आहे, त्याचवेळी स्टॉइनिसला ११ कोटी मिळतील. आयपीएलच्या गेल्या दोन मोसमात चांगली कामगिरी करणारा लेगस्पिनर रवी बिश्नोईला ४ कोटी रुपये मिळणार आहेत.

लखनऊ फ्रेंचायझीने झिम्बाब्वेचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. याआधी ते पंजाब किंग्जचे सहाय्यक प्रशिक्षक होते. गौतम गंभीरला संघाचा मेंटॉर करण्यात आले आहे. गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरला दोनदा चॅम्पियन बनवले आहे. हा संघ टी-२० लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ आहे. RPSG ग्रुपने ७०९० कोटी रुपयांना संघ विकत घेतला आहे.

राहुलला पंजाब किंग्जने २०१८च्या लिलावात ११ कोटी रुपयांची बोली लावून निवडले होते. माजी कर्णधार रवीचंद्रन अश्विनने २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये प्रवेश केल्यानंतर राहुलला पंजाब संघाचा कर्णधार बनवण्यात आले. पंजाबमध्ये सामील झाल्यानंतर राहुलने सलग ४ हंगामात ५७५ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आयपीएल २०२१मध्ये ६२६ धावांसह राहुल तिसऱ्या क्रमांकावर होता.

युवा गोलंदाज रवी बिश्नोईला पंजाब किंग्जने आणि मार्कस स्टॉइनिसला दिल्ली कॅपिटल्सने लिलावापूर्वी रिलीज केले. बिश्नोईने अंडर १९ वर्ल्डकप २०२० मध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या. यानंतर पंजाब किंग्जने त्याला आपल्यासोबत जोडले. बिश्नोईने दोन हंगामात २३ सामन्यांत २४ बळी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.