पराभवाचा बदला घेणार’; रोहित पवारांचा अजितदादांना टोला

पराभवाचा बदला घेणार’; रोहित पवारांचा अजितदादांना टोला

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - २०१९ मध्ये मावळ लोकसभेत अजित पवारांना मोठा धक्का बसला होता. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. मात्र, आता तेच अजित पवार श्रीरंग बारणेंचा प्रचार करताना दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. ते पिंपरीत पत्रकारांशी बोलत होते.

रोहित पवार म्हणाले की, संजोग वाघेरे यांच्या बाजूने आजचे वातावरण आहे. वाघेरे हे नवीन खासदार असतील. अजित पवार हे शरद पवार यांना वडील मानायचे. त्यांना सोडून स्वतःच साम्राज्य आणि कारवाईपासून लपून राहण्यासाठी महायुती आणि भाजपसोबत अजित पवार गेले आहेत. अजित पवारांनी वडिलांचा विचार केला नाही. ज्या व्यक्तीने मुलाचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्या गोष्टी विसरून ज्या उमेदवाराने पराभव केला त्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार येत असतील तर यावरूनच अजित पवारांची परिस्थिती कळून येत आहे.

अजित पवार हे या सर्व गोष्टी विसरले असतील. मला पार्थला सांगायचं आहे. या गोष्टी मी विसरलो नाही. ज्या व्यक्तीने तुझा पराभव केला. त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी तुझा भाऊ इथं आलेला आहे. काही गोष्टी अजित पवार हे खोटं बोलत आहेत. एबी फॉर्म मला अजित पवारांनी दिला. मला निवडणूक लढायची होती. अपक्ष लढायचं नव्हतं. अजित पवार पन्नास टक्के खरे आणि खोटं बोलत आहेत.पुढे ते म्हणाले, पार्थ पवार यांना वाय नव्हे तर झेड सुरक्षा द्यायला हवी. महाराष्ट्रात वाढलेल्या गुन्हेगारीवर देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष नाही. नेत्यांच्या मुलांना सुरक्षा देत आहेत, असंही रोहित पवार म्हणाले.