कार अल्टरेशन’चे प्रमाण उद्योगनगरीत वाढले

कार अल्टरेशन’चे प्रमाण उद्योगनगरीत वाढले

       पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) -     अलीकडे कारला गोल्ड प्लेटिंग करणे असो वा अन्य प्रकारचे रॅपिंग करणाऱ्यांमुळे ‘शौक बडी चीज हैं’चा प्रत्यय पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवायला मिळत आहे. या विनापरवाना ‘कार अल्टरेशन’वर सातत्याने दंड ठोठावण्यात येऊनही ‘होऊ दे दंडावर खर्च’ असे म्हणत ‘कार अल्टरेशन’चे प्रमाण उद्योगनगरीत वाढले आहे.  

सांगवी वाहतूक विभागाने संजय गुजर उर्फ गोल्डमॅन बंटी गुजर यांच्या गोल्ड प्लेटेड ऑडी या आलिशान गाडीच्या काळ्या काचांवर कारवाई केली. त्यानंतर पुन्हा एकदा शहरातील रॅपिंग केलेल्या कार, गोल्ड प्लेटिंग तसेच मल्टीकलर (फिरता रंग), प्लॅटिनम कलर प्लेटिंग करण्यात आलेल्या गाड्यांचा मुद्दा आणि या शौकिनांच्या अलिशान गाड्यांना लाखो रुपयांच्या बदल्यात मॉडिफिकेशन करून देणारा व्यवसाय चर्चेत आला आहे. विना परवाना वाहनांमध्ये बदल केलेल्यांवर पिंपरी-चिंचवडमध्ये सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र, हे प्रकार थांबायचे नाव घेत नाहीत.

पिंपरी-चिंचवड म्हणजे प्रशस्त रस्ते अन् बेशिस्त वाहतूक हा नित्याचा प्रकार आहे. महापालिका होऊन ३७ वर्षे तर पोलीस आयुक्तालय होऊन ६ वर्षे उलटली तरी शहराचे गावपण अद्याप गेलेले नाही. त्यामुळे नियम आम्हाला लागू नाहीत, असा काहीसा तोरा स्थानिकांचा येथे कायम पाहायला मिळतो. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी यांनी नुकतीच वाहतूक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तेव्हा शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे एक सादरीकरण वाहतूक विभागाचे उपायुक्त विशाल गायकवाड यांनी केले होते.

परंतु, वाहतूक सुधरण्याबरोबरीनेच येथील नागरिकांना शिस्त लावणेदेखील तितकेच आवश्यक असून, नियम भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दोन्ही सहाय्यक आयुक्त, सर्व वरिष्ठ निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक यांना बैठकीत देण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून कारवाई सुरू असताना गोल्ड प्लेटेड गाडीवर पोलिसांनी कारवाई केली. एका दिवसात एक दोन नव्हे तर ४०६ वाहनांवर कारवाई करीत चालकांना ४.३७ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील संजय गुजर आणि त्यांचा एक मित्र या दोघांकडील सहा ते सात अलिशान कारला गोल्ड प्लेटिंग करण्यात आले आहे. मागील १५ ते १८ वर्षांमध्ये या कारचा वापर बॉलिवूडच्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी आपल्या चित्रपटात केला आहे. तसेच अनेक सिने अभिनेते हे या दोघांचे चांगले मित्र असून, इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडियावर या दोघांचे गोल्ड प्लेटेड कारसह अनेक फोटो-व्हीडीओ अपलोड करण्यात आलेले आहेत. गोल्डमॅन म्हणून हे दोघे सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध आहेत. या दोघांपैकी एकाच्या वाहनावर काश्मीरमध्येदेखील यापूर्वी गाडी गोल्ड प्लेटेड केली म्हणून दंड ठोठावण्यात आला होता.