उष्माघातापासून सावध राहा! तापमानात वाढ होण्याची शक्यता, कशी घ्याल खबरदारी?

उष्माघातापासून सावध राहा! तापमानात वाढ होण्याची शक्यता, कशी घ्याल खबरदारी?

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   -     उन्हाचा कडाका वाढत असून, कमाल तापमानामध्ये काही दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका असून, नागरिकांनी बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने केले आहे.

आरोग्य वैद्यकीय विभागाने या विषयी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यांमध्ये उष्माघाताचा प्रादूर्भाव होत असतो. सध्या हवामानात बदल झाला असून शहराचे तापमान खूप वाढत आहे. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवडकरांनी उष्माघातासारख्या जीवघेण्या परिस्थितीतून वाचण्यासाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

उन्हाळ्यात शारीरिक श्रम, मेहनतीची व मजुरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्येक उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होत असल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.

मळमळ, उलटी, हातापायांत गोळे येणे, थकवा येणे, ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, घाम न येणे, डीहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धावस्था ही उष्माघाताची लक्षणे असल्याचे म्हटले आहे.

गर्भवती महिला, बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणारी व्यक्ती, वयस्कर, वृद्ध, ज्या व्यक्तींना रक्तदाब व मधुमेहाचे आजार, हृदयरोग, फुफुसाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, यकृताचे आजार, आजारी असणारे व्यक्ती या गटामध्ये समाविष्ट आहेत.

उष्माघात टाळण्यासाठी उपाय

उष्माघाताच्या बचावासाठी प्रत्येकाने पाणी भरपूर प्यावे
- डीहायड्रेशन होऊ देऊ नये
- लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी प्यावे
- उन्हात बाहेर जाताना, गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री, यांचा वापर करावा
- पार्क केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नये
- त्वचेवर घामोळे आल्यास क्रीम किंवा ऑइंनमेंट न वापरता पावडर वापरावे
- उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पालिकेच्या आरोग्य केंद्र, रुग्णालय अथवा खासगी रुग्णालयाशी संपर्क करावा