शिरूरसाठी आढळराव २६ तारखेला राष्ट्रवादीत

शिरूरसाठी आढळराव २६ तारखेला राष्ट्रवादीत

        मुंबई ,  (प्रबोधन न्यूज )  -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा २६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान बैठकही झाली. या बैठकीला अजित पवार यांच्यासह शिवाजीराव आढळराव पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या बैठकीत आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत माहिती दिली. त्यानुसार, मंगळवार, २६ मार्च रोजी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मोठा होणार असून, अढळराव पाटील आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेश हा शिरूरमध्येच होणार आहे. अढळरावांच्या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास मदत होईल, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

आम्ही विजय मिळविणार : तटकरे
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने आम्ही विजय मिळवणार आहोत. शिरूरमधील आंबेगाव परिसरात आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या प्रचाराचा नारळही तेव्हाच फोडणार आहे, असेही सुनील तटकरे म्हणाले.