वारकरी दृष्टी मधून गणेशाचे होणारे दर्शन अत्यंत वेगळे -   ह.भ.प. अभय महाराज टिळक

वारकरी दृष्टी मधून गणेशाचे होणारे दर्शन अत्यंत वेगळे   -   ह.भ.प. अभय महाराज टिळक

 श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनमाला

पुणे , (प्रबोधन न्यूज )   - वारकरी संप्रदायाचे दैवत श्री विठ्ठल आणि श्री गणेश यांचे अत्यंत जवळचे नाते आहे. संतश्रेष्ठ  ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी ज्या भक्तीने, वैभवाने, श्रीमंतीने, प्रतिभेने, कल्पकतेने गणेशाचे वर्णन केले आहे, त्याचा परिचय आपल्याला व्हायला हवा. वारकरी दृष्टी मधून गणेशाचे होणारे दर्शन अत्यंत वेगळे आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. अभय महाराज टिळक यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचनमालेत ह.भ.प. अभय महाराज टिळक  यांचे प्रवचन झाले. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम सुरु आहे.

अभय महाराज टिळक म्हणाले, ज्ञानोबाराय, एकनाथ आणि तुकाराम महाराज यांनी मांडलेले गणेश हे आपल्या परिचित गणेशाच्या पेक्षा वेगळे आहे.आपल्याला परिचित असलेले गणेशाचे रूप हे विद्येचे दैवत आहे. आपण त्याला बुद्धीदाता असे म्हणतो.  मात्र, ज्ञानोबाराय तुकोबारायांनी याचे सूक्ष्म वर्णन करीत गणेशाला निसर्गात : मिळालेल्या बुद्धीला शुद्धीचे, पावित्र्याचे,  मांगल्याचे लेणे चढविणारे दैवत म्हणून गणेशाकडे पाहतात. ज्ञानोबारायांसमोर श्री गणेशाचे रूप हे मूर्तीमंत ज्ञानी पुरुषाचे रूप आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, दिनांक १३ ते १९ जुलै दरम्यान दररोज सायंकाळी ५.३० ते ८ यावेळेत चातुर्मास कीर्तनांतर्गत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.