पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

  पिंपरी , (प्रबोधन  न्यूज )  -  बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने काळा खडक, वाकड येथून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 7) करण्यात आली.

विशाल शहाजी कसबे (रा. वाकड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार संदीप पाटील आणि अशोक गारगोटे यांना माहिती मिळाली की, वाकड परिसरातील काळा खडक येथे एक सराईत गुन्हेगार आला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा लाऊन विशाल कसबे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 हजार 500 रुपयांचे एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.

विशाल कसबे हा वाकड पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मारहाण, दंगल असे गंभीर स्वरूपाचे 16 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची देखील कारवाई करण्यात आली आहे. त्याला वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.