आज संत मुक्ताबाई यांचा ७२५ वा तेजोविलीन दिन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आज संत मुक्ताबाई यांचा ७२५ वा तेजोविलीन दिन

ज्यांनी वयाने लहान असूनही मोठा भाऊ संत ज्ञानेश्वरांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढले, त्यामुळेच ते विश्वाची माऊली होऊ शकले; ज्यांनी पहिल्यांदा संत कोणाला म्हणावे, याची व्याख्या केली; ज्यांनी इतरांचे गुरू असलेल्या योगी चांगदेव, संत विसोबा खेचर, संत नामदेव आदी महापुरुषांनाही बोध केला; त्या ज्ञानदेवादी भावंडांच्या धाकुट्या भगिनी संत मुक्ताबाई यांचा आज ७२५ वा तेजोविलीन दिन अर्थात अंतर्धान समाधी दिन.

या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर या मुक्ताबाईंच्या समाधी स्थळी अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १८ मेपासून हा सोहळा सुरू झालेला आहे.

आदिशक्ती मुक्ताबाईंच्या भेटीसाठी पंढरपूरहून श्री पांडुरंगराय, कौंडण्यपूरहून माता रुक्मिणी, पंढरपूरहून संत नामदेव, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ, आळंदीहून संत ज्ञानेश्वर आणि सासवडहून संत सोपानदेव यांच्या पालख्या दाखल झाल्या आहेत. देहूहून संत तुकाराम महाराजांचे प्रतिनिधीही सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले आहेत. सोहळ्याच्या आजच्या मुख्य दिवशी संत मुक्ताई महापूजा, समाधीवर पुष्पवृष्टी आणि संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज ह. भ. प. केशवदास नामदास महाराज पंढरपूर यांची गुलालाची कीर्तनसेवा होणार आहे.

२६ मे रोजी मुक्ताई मूळ मंदिर ते नवीन मंदिर पांडुरंग पालखी सोहळा मिरवणूक होईल. यात शेकडो दिंड्यांचा सहभाग असेल. तर सकाळी ह. भ. प. सारंगधर महाराज गोळेगावकर, सायंकाळी ह. भ. प. गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे कीर्तन होईल. तर, २७ मे रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत ह. भ. प. केशवदास नामदास महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

वाळीत टाकलेल्या परिस्थितीने घडविले...

आपल्या भावंडांप्रमाणेच मुक्ताबाईंच्या जन्मकाळासंबंधी एकमत नाही. मुक्ताबाईचा जन्म एका मतानुसार १२७७, तर दुसऱ्या मतानुसार १२७९ ठरतो. पहिल्या मतानुसार त्यांना एकूण २० वर्षांचे आयुष्य लाभले होते. दुसऱ्या मतानुसार मृत्युकाळी त्या १८ वर्षांच्या होत्या. जन्मस्थळही आपेंगाव, की आळंदी याबाबत मतभेद आहेत.

इतर भावंडांप्रमाणेच छोट्या मुक्ताईच्या वाट्यालाही उपेक्षा, वनवास आला. कारण लग्नानंतर संन्यास घेऊन पुन्हा संसारात रमल्यामुळे त्यांच्या मात्यापित्यांना वाळीत टाकण्यात आले होते. या दोघांनी नंतर देहांत प्रायश्चित्त घेतले आणि या भावंडांचे छत्र हरपले. या भावंडांवरही बहिष्कार टाकण्यात आला. पण या अनुभवातून ही भावंडे तावून सुलाखून निघाली. भातुकली खेळण्याच्या वयातच मुक्ताईवर जबाबदारी पडली. वाळीत टाकलेलं जीवन, समाजाकडून अवहेलना, आप्तांचे झिडकारणे, शेजारपाजाऱ्यांकडून अपमान या कटू अनुभवांनी मुक्ताबाईचे व्यक्तिमत्त्व कणखर बनले.

मुक्ताईमुळे ज्ञानदेव बनले विश्वाची माऊली...

धाकुट्या मुक्ताबाईने आपल्या मोठ्या भावंडांना आईच्या प्रेमाने सावरले आणि प्रसंगी कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी वडिलांसारखी कठोरही झाली. त्यामुळेच मुक्ताबाईने वेळीच भानावर आणले नसते, तर ज्ञानदेव घडलेच नसते, असे ठामपणे म्हणता येते.

एकदा या भावंडांना मांडे खाण्याची इच्छा झाली. त्यासाठी मुक्ताई खापराचे भांडे आणायला कुंभाराकडे गेली. पण विसोबा खेचर नावाच्या निष्ठूर माणसाने हे भांडे तिला मिळू दिले नाही. अशा वारंवार होणाऱ्या अवहेलनेला ज्ञानदेवही कंटाळले. अपमानाने चिडले, संतापले, रुसले. दार बंद करून घरात बसले. जेवायलाही येईनात. मग मुक्ताईनं वडिलकीची भूमिका घेतली. ज्ञानदेवाची समजूत घालण्यासाठी दाराशी बसून तिने जे अभंग आळवले ते 'ताटीचे अभंग' म्हणून अमर झाले.

संत जेणें व्हावें। जग बोलणे साहावें॥

तरीच अंगी थोरपण। जया नाही अभिमान॥

थोरपण जेथे वसें। तेथे भूतदया असें॥

रागें भरावे कवणाशी। आपण ब्रम्ह सर्वेदेशी॥

ऐशी समदृष्टी करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥

अशा ताटीच्या अभंगांमुळेच ज्ञानदेव पुन्हा भानावर आले. राग, अहंकार, असूया सोडून इतरांवर प्रेम करण्याचा संदेश तिने या अभंगांतून दिला. मुक्ताईच्या या अभंगांमधूनच संत ज्ञानेश्वर पुढे प्रेमाचा वर्षाव करणारी विश्वाची माऊली झाले.

संत मांदियाळीवर अधिकार...

संत मांदियाळीत मुक्ताबाईंचे नाव मानाने घेतले जात. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान हे साक्षात ब्रम्हा, विष्णू आणि महेश, तर इटुकली मुक्ताई म्हणजे आदिमायेचा अवतार, असे संत नामदेवांनी म्हटले आहे.

सतत देवाच्या सान्निध्यात राहणारा, देवाचा लाडका म्हणून संत नामदेवांना अहंकार झाला होता, तो संत मुक्ताबाईंनी उतरवला, अशी एक कथा सांगितली जाते.

संत गोरोबाकाकांकरवी त्यांनी नामदेवांची परीक्षा करवून घेतली आणि त्यांना संत विसोबा खेचर यांचे शिष्यत्त्व घ्यायला लावले. हे विसोबा खेचर आणि ज्यांचे संत नामदेवांनी भिंत चालवून गर्वहरण केले, त्या योगी चांगदेवांनीही मुक्ताबाईंना गुरू मानले.

मुक्ताबाईंचे अभंग लेखन...

गाथेत संत मुक्ताबाईंच्या नावावर एकूण ४२ अभंग आहेत. त्यात त्यांनी शिष्य चांगदेवांना उद्देशून रचलेल्या सहा अभंगांची भर घालावी लागेल. नामदेव गाथेतील ‘नामदेव-भक्तिगर्वपरिहार’ या मथळ्याखालील अभंगांपैकी (१३३४ ते १३६४) १०-१५ तरी निश्चितपणे मुक्ताबाईंचे आहेत. गाथेत न मिळणारे ‘ताटीचे अभंग’ तर प्रसिद्धच आहेत. म्हणजे मुक्ताबाईंची एकूण अभंगरचना सुमारे पाऊणशेच्या घरात जाते. मुक्ताबाईंच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आहे, साक्षात्काराचे पडसाद आहेत, हे सर्व खरे पण त्याबरोबरच त्यांत हृदयाचे मार्दव, भावनेची हळुवारता आणि परखडपणाही आहे. 'ज्ञानबोध' ग्रंथांचे देखील त्यांनी लेखन केले. या ग्रंथात आपले वडील बंधू संत निवृत्तीनाथ यांच्यासोबतचा संवाद पाहायला मिळतो.

मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी...

संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रेला गेले.  फिरता फिरता १२ मे १२९७ रोजी तापी नदीच्या तीरावर आले असता अचानक वीज कडाडली आणि त्या विजेच्या प्रचंड कडकडाटात संत मुक्ताबाई लुप्त झाल्या...

संत नामदेवांच्या अभंगावरून वारकरी शके १२१९, वैशाख वद्य १०, ही मुक्ताबाईंची समाधितिथी मानतात.

अशा या मराठीतील पहिल्या कवयित्री, आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचा त्रिवार दंडवत!