रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनी विविध उपक्रमांचे आयोजन 

रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनी विविध उपक्रमांचे आयोजन 
पिंपरी -
रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण, रोपांचे वाटप, मास्क-सॅनिटायझर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच सफाई कामगार, डॉक्टर, परिचारिका आदींचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश भोरखडे, पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, डॉ. कीर्ती गायकवाड, डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य परिचारिका सरला चव्हाण, उद्यान विभागाचे अधिकारी गोरख गोसावी आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश भोरखडे यांच्या मार्गदर्शनखाली या सर्व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

काळेवाडी येथे तृतीयपंथीयांकडून वृक्षरोपण आणि रोपांचे वाटप करण्यात आले. यासाठी उद्यान विभागाचे अधिकारी गोरख गोसावी व इतर कर्मचाऱ्यांचे साहाय्य लाभले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तृतीयपंथीयांमार्फत नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच वाहतुकीचे व कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

नवीन थेरगाव रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात. गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सफाई कामगार आणि आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून गुलाबाचे फूल देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये आरोग्य अधिकारी बी.बी कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, आरोग्य निरीक्षक शैलेश वाघमारे, मुकादम शिवपुत्र नंदर्गे, श्रीकांत कदम यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे म्हणाले, की समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. तो बदलण्याची गरज आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त तृतीयपंथीयांच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले. यापुढेही असे समाजहिताच्या कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहनही उंडे यांनी केले.

डॉ. कीर्ती गायकवाड म्हणाल्या, की आज प्रजासत्ताक दिना निमित्त रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे समाजाच्या दृष्टीने उचललेले पाऊल अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडे समाजाने एक आदर्श म्हणून पाहावे आणि त्याप्रमाणे कृती करावी. डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य परिचारिका सरला चव्हाण आणि इतर सर्व रुग्णालयातील स्टाफने संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि तृतीयपंथी यांनाही सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तो मिळाला पाहिजे, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.