सत्तेबाहेर असूनही आम्हीच नंबर वन ! चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला 

सत्तेबाहेर असूनही आम्हीच नंबर वन ! चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला 
मुंबई -
आम्ही गेल्या 26 महिन्यांपासून सत्तेच्या बाहेर आहोत. पण आज झालेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरून सत्ताधारी नव्हे तर आम्हीच राज्यात नंबर वन आहोत हे सिद्ध झालं आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेनेला चांगलेच चिमटे काढले. राज्यातील नगरपालिका – नगरपंचायती तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळविल्या असून पुन्हा एकदा ‘भाजपाच नंबर वन’ हे सिद्ध झाले आहे, असं पाटील यांनी सांगितलं. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी आणि सुनील कर्जतकर उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरविल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मतदारांचे आभार मानले आणि पक्षाच्या गावोगावच्या नेते – कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. भाजपाला या निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर किंवा काही मदत घेऊन 34 नगरपालिका – नगरपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता असेल. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असेल तर भंडारा जिल्हा परिषदेत मदत घेऊन भाजपा सत्तेवर येईल, असं त्यांनी सांगितलं.

गेले 26 महिने भाजपा राज्यात सत्तेबाहेर आहे तरीही पक्षाचे संघटन मजबूत आहे. भाजपाच्या नेते – कार्यकर्त्यांची एकजूट आहे. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळाले आहे. सत्ताधारी आघाडीमध्ये बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नाही. कोरोनाचा सामना करणे आणि राज्यात विकासकामे करण्यापेक्षा आघाडीचे नेते कमाईमध्ये गुंतले आहेत. जनता या प्रकाराला कंटाळली आहे. जनतेची नाराजी नगरपालिका- नगर पंचायतींच्या निकालात दिसली, असं त्यांनी सांगितलं.

राज्यात नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका किंवा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने भाजपाला कौल दिला होता. तसाच कौल नगरपालिका- नगरपंचायतींच्या निवडणुकीतही दिला आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.