'झेपत नसेल तर पुण्याचं पालकमंत्रीपद सोडा !'  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना खोचक सल्ला 

'झेपत नसेल तर पुण्याचं पालकमंत्रीपद सोडा !'  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना खोचक सल्ला 

पुणे, (प्रबोधन न्यूज) - पुण्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजविला असतानाच या संकटकाळात अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्षचंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. 

ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक लढाया रंगताना दिसत आहेत. यावेळी चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारच्या संभाव्य लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केला. त्यांनी पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली. पुण्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं. पुणे जिल्ह्यात लक्ष घालायला त्यांना वेळ नसेल तर पुण्याचा पालकमंत्री बदला, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यामुळे आता अजित पवार या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.