संदीप महाजन यांच्यावरील हल्ला म्हणजे राज्यातील पत्रकारितेवरचा हल्ला आहे - गोविंद वाकडे

संदीप महाजन यांच्यावरील हल्ला म्हणजे राज्यातील पत्रकारितेवरचा हल्ला आहे - गोविंद वाकडे
  निगडी , (प्रबोधन न्यूज )  -       पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करून त्या हल्ल्याचे चित्रीकरण केले व ते राज्यात सर्वत्र प्रसारित केले त्यांनी केलेले हे कृत्य म्हणजे राज्यातील पत्रकारांना दिलेला इशारा आहे व हा हल्ला केवळ संदीप महाजन यांच्या वरचा नसून तो अखंड पत्रकारीतेवरचा हल्ला आहे, एक षडयंत्र आहे, असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक गोविंद वाकडे यांनी येथे केले.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार आज राज्यभरात पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणून तसेच पाचोर्‍याचे पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आंदोलने करण्यात आली पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार कार्यालय निगडी येथे निषेध आंदोलन व पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची होळी करण्यात आली. 
यावेळी संबोधित करताना गोविंद वाकडे म्हणाले की मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात पत्रकार हल्ला विरोधी कायदा अस्तित्वात आला एस एम देशमुख सर यांनी जाणले होते भविष्यात अशा प्रकारे कायदा असणे हे पत्रकारांच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. परंतु त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात नाही. शासनाने तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अन्यथा रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यासारखी आमची हत्या झाली तरीही आम्ही आमचा वारसा सोडणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव नाना कांबळे म्हणाले की, राज्यात पत्रकार हल्ला विरोधी कायदा अस्तित्वात आला तो केवळ मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व किरण नाईक यांच्या प्रयत्नामुळे मात्र या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात नाही यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, वस्तुतः पत्रकारांना यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. ज्येष्ठ पत्रकार अनिल वडघुले यावेळी म्हणाले की देशभरात पत्रांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढत असून त्या विरोधात आता सर्व पत्रकारांनी संघटितपणे लढण्याची आवश्यकता आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के, उपाध्यक्ष माधुरी कोराड, अविनाश कांबीकर यांनी निषेधपर भाषणे केली या आंदोलनात पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया संघाचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे महिला अध्यक्ष अर्चना मेंगडे पिंपरी चिंचवड हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक अनिल भालेराव पत्रकार संघाचे सरचिटणीस गौरव साळुंखे, उपाध्यक्ष गणेश मोरे, देवा भालके, महावीर जाधव, सीता जगताप, मुजफ्फर इनामदार, संदेश गोतावळे, अशोक कोकणे संदीप राजगुरू यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांच्या वतीने निषेधाच्या घोषणा देत पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात आली तसेच यासंदर्भात पिंपरी चिंचवडचे नायब तहसीलदार ढमाले यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.