पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. याचाच विचार करून मानस शास्त्र क्षेत्रात काम करणाऱ्या 'कार्पेडियम' ही संस्था विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी मार्गदर्शन करते. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी व्यक्तीचे मानसिक आरोग्य आणि संतुलन चांगले असण्याची गरज आहे. 'यशाला गंध मानसिक सुदृढतेचा' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन कार्पोडियमच्या संस्थापक सदस्य आणि मानसोपचार तज्ज्ञ वसुंधरा कौल यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयु) मुख्यालयात पीसीयु आणि 'कार्पेडियम' यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी कौल बोलत होत्या.
यावेळी कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी, उप कुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज, डॉ. सागर भडंगे, प्रा. रुचू कुठयाला, कार्पेडियमच्या संस्थापक सदस्य तन्वी औरधकर आदी उपस्थित होते.
कौल म्हणाल्या की, आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावामुळे मनुष्याला मानसिक समस्या निर्माण होतात; हे अभ्यासातून समोर आले आहे. अशा समस्यांचा विचार करून आम्ही 'कार्पेडियम' संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून समाजाचे मानसिक स्थैर्य उत्तम राहील यासाठी प्रयत्न केले जातात असे त्यांनी सांगितले.
औरधकर म्हणाल्या, विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन तसेच मानसिक आधार देण्याचे काम कार्पेडियम करते. विद्यार्थ्यांसाठी योग्यता चाचणी (ॲप्टिट्यूड टेस्ट), परीक्षा, मुलाखती याविषयीची भीती, नैराश्य दूर करणे, यशा-अपयशाला योग्य प्रकारे सामोरे जाण्यासाठी मदत केली जाते, असे औरधकर यांनी सांगितले.
डॉ. मनिमाला पुरी म्हणाल्या, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेत शैक्षणिक अभ्यासक्रमांची आखणी केली आहे. या अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल असे सांगितले.
डॉ. राजीव भारद्वाज यांनी पीसीईटीच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी, उप कुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत आणि सूत्रसंचालन प्रा. रुचू कुठयाला यांनी केले. आभार डॉ. सागर भडंगे यांनी मानले.
फोटो ओळ : पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि 'कार्पेडियम' यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी प्रा. रुचू कुठयाला, तन्वी औरधकर, वसुंधरा कौल, डॉ. राजीव भारद्वाज, डॉ. मनिमाला पुरी उपस्थित होत्या.