शरद पवारांनी मविआमधून बाहेर पडून मोदींसोबत काम करावे – रामदास आठवले

जसा करिष्मा नागालँडमध्ये झाला आहे तसाच करिष्मा येत्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत करुन दाखवणार असल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

शरद पवारांनी मविआमधून बाहेर पडून मोदींसोबत काम करावे – रामदास आठवले

बीड - राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अनुभवी नेते असून, त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करावं असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या बीड शहरातील नूतन कार्यालयाचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील आढावा देखील आठवले यांनी घेतला. यानंतर माध्‍यमांशी त्‍यांनी संवाद साधला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते बीडमध्ये थांबले असता आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केले. पन्नास फुटांचा हार, जेसीबीवरून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी अशा स्वरूपात या उत्साही कार्यकर्त्यांनी आठवलेंचं स्वागत केले आहे.

यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, "शरद पवार हे अनुभवी आणि मोठे नेते आहेत. त्यांनी नागालँडमध्ये भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करावं अशी माझी इच्छा आहे." नागालँडमध्ये पवार साहेबांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी आता महाविकास आघाडीमधून बाहेर पडून मोदी साहेबांसोबत काम करावं अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकर यांची युती ही फक्त शिवसेनेशी झाली आहे. ते अजूनही महाविकास आघाडीत गेलेले नाही. त्यामुळे मी दोन पावलं मागे यायला तयार असल्याचं रामदास आठवले म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये कितीही नेते उभे राहिले तरी त्यांचा पराभव करणे कोणालाही शक्य होणार नाही. त्यामुळे सर्व दलित नेत्यांनी एकत्र येऊन रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल व्हावं आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकाच पक्षाची आवश्यकता असणे गरजेचे आहे असं देखील आठवले म्हणाले आहेत.

पुढे बोलताना आठवले म्हणाले की, "नुकत्याच झालेल्या नागालँड येथील निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या असून, जसा करिष्मा नागालँडमध्ये झाला आहे तसाच करिष्मा येत्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत करुन दाखवणार आहे." मात्र या निवडणुकीत आपण भाजप आणि शिंदे यांच्यासोबत राहून आपल्या पक्षाचे खातं उघडणार असल्याचं आठवले म्हणाले.