नारायण राणे यांची अनिल परब यांच्यावर जहरी टिका

नारायण राणे यांची अनिल परब यांच्यावर जहरी टिका


सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेचा ‘कलेक्टर म्हणत’ निशाणा

सिंधुदुर्ग - राज्यात काल अहमदनगर जिल्ह्यात एका एसटी कर्मचाऱ्याने एसटी बसच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी शिडीला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष देखील या घटनेवरुन आक्रमक झाला असून भाजपच्या जवळपास सर्वच वरिष्ठ नेत्यांनी या घटनेवरुन महाविकास आघाडीवर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी देखील सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.
नारायण राणे म्हणाले, "एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. पगार किती आहेत हे माहिती नाही, ही अवस्था एसटी कर्मचाऱ्यांची आहे. रस्त्यावर येण्याची परवानगी असता कामा नये, अशी एसटी बसेसची अवस्था झाली आहे. खरंतर त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढं त्याने कमवलं आहे. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो, कलेक्टर आहे तो शिवसेनेचा." असे सांगत राणेंनी अनिल परबांवर हल्ला चढवला आहे.
अहमदनगरमध्ये शेवगाव आगारातील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शुक्रवारी सकाळी हि घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे (वय ५० वर्ष) असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. काकडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा पुण्यात कंपनीमध्ये आहे, तर दुसरा मुलगा संस्थेमध्ये नोकरी करत असून मुलीचे लग्न झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा आपल्या मागण्यांसाठी संप सुरु होता. त्यातच ही आत्महत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली.