महापालिकेतर्फे ४ जूनला सकाळी ८ ते १२ या वेळेत “रिव्हर प्लॉगेथॉन” मोहीम

महापालिकेतर्फे ४ जूनला सकाळी ८ ते १२ या वेळेत “रिव्हर प्लॉगेथॉन” मोहीम

पिंपरी-चिंचवड, दि. 31 मे - पिंपरी चिंचवड शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात राबवण्यात येत असलेल्या प्लास्टिकमुक्ती मोहिमेत नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सामाजिक संस्था, महाविद्यालये यांच्या निरंतर सहभागातून ही विशेष मोहीम हमखास यशस्वी होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी व्यक्त केला.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात प्लास्टिक मुक्तीसाठी २५ मे २०२२ पासून ५ जून २०२२ दरम्यान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी शहरातील महाविद्यालये, विविध बिगर शासकीय संस्था, कंपन्या यांच्या प्रतिनिधींसोबत आज समन्वय बैठक घेण्यात आली, त्या बैठकीत उपस्थित प्रतिनिधींसमवेत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी निवृत्त अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, आठही क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आरोग्याधिकारी यांच्यासह शहरातील महाविद्यालये, सामाजिक संस्था, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त ढाकणे म्हणाले, महापालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिक मुक्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्लास्टिक वापराचे तोटे, पर्यावरणाला, जैवविविधतेला प्लास्टिक वापरामुळे निर्माण होणारे धोके याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनीही यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी करण्यात आपले योगदान दिले आहे. प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळून जास्तीत जास्त कापडी पिशव्यांच्या वापरावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या समन्वय बैठकीत सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी अनेक सूचना मांडल्या. या सामाजिक उपक्रमात गणेश मंडळे, शहरातील मोठ्या सोसायट्या यांनाही सहभागी करून घ्यावे, नदीकाठी असणारे निर्माल्यकुंड पुन्हा सुरू करावे, सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक वापरणा-यांवर कारवाई करावी, प्लास्टिक संकलित करण्यासाठी वेगळी घंटागाडी सुरू करावी अशा सूचना करण्यात आल्या.

शहरात ४ जून रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत “रिव्हर प्लॉगेथॉन” मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये पवना नदीमध्ये सांगवडे (किवळे) ते संगम येथे, मुळा नदीमध्ये वाकड ते संगम येथे, इंद्रायणी नदीमध्ये तळवडे ते चऱ्होली येथे “रिव्हर प्लॉगेथॉन” मोहिम पार पडणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी यावेळी केले.