अगोदर दगडफेक, आता कान पकडून माफीची याचना

अगोदर दगडफेक, आता कान पकडून माफीची याचना

श्रीनगर, दि. 26 मे - जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता आणि दहशतवादी यासिन मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर काही तरुणांनी श्रीनगरमध्ये दगडफेक केली. यापैकी आतापर्यंत 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एवढेच नाही तर कालपर्यंत दगडफेक करणारे हे लोक आता पोलीस ठाण्यात कान पकडून आपल्या कृत्याची माफी मागताना दिसत आहेत. श्रीनगर पोलिसांनी सांगितले की, यासिन मलिकच्या घराबाहेर देशविरोधी घोषणाबाजी आणि दगडफेक केल्याप्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, मलिकला दिल्लीत शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या परिसरात मैसुमा येथे हिंसक निदर्शने झाली. मात्र, इतर भागात शांतता होती.

पोलिसांनी सांगितले की, काही जणांना अटक करणे बाकी आहे. श्रीनगर पोलिसांनी सांगितले की, "इतर आरोपींचीही ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल." आयपीसी कलम आणि यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय हा हिंसाचार भडकावणाऱ्या मुख्य आरोपींवर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासीन मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्याच्या श्रीनगरमधील घराबाहेर दगडफेक करण्यात आली. मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांचा पाठलाग केला.

इतकेच नाही तर यासीन मलिकच्या पत्नीनेही शिक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आपल्या पतीला धाडसी व्यक्ती म्हटले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना हिटलरशी केली होती. विशेष म्हणजे हिंसाचार भडकल्यानंतर प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी काही भागात इंटरनेट बंद करून कडकपणा वाढवला होता. यासिन मलिकच्या शिक्षेवर पाकिस्तानही संतापला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यासीनच्या शिक्षेला लोकशाहीसाठी काळा दिवस म्हटले होते. याशिवाय क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसह पाकिस्तानचे अनेक सेलिब्रिटी दहशतवादी यासिन मलिकला झालेल्या शिक्षेवर अश्रू ढाळले आहेत. इतकंच नाही तर शाहिद आफ्रिदीनं हा मुद्दा संयुक्त राष्ट्रातही नेण्याचं आवाहन केलं होतं.