मी अजून म्हातारा झालो नाही, लोकांना सरळ करण्याची माझ्यात ताकद

मी अजून म्हातारा झालो नाही, लोकांना सरळ करण्याची माझ्यात ताकद

पुणे , (प्रबोधन न्यूज )   -  तुम्ही माझे काय बघितलेय? मी अजूनही म्हातारा झालेलो नाही. अजूनही लय भारी लोकांना सरळ करू शकतो असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यामुळे पवारांचा रोख पक्षात बंडखोरी केलेल्या नेत्यांकडे आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील च-होली खुर्द येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार बोलत होते.

शेती संपन्न झाली पण ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. त्यांना बळिराजाबद्दल प्रेम नाही. मोठ्या कष्टाने शेतक-यांनी कांदा पिकवला मात्र, त्याला चांगला दर नाही. चांगला दर मिळत असताना कांद्यावर निर्यातबंदी लावली. शेतक-यांना मदत करण्याऐवजी सरकारने संकट वाढवण्याच्या गोष्टी केल्याचे शरद पवार म्हणाले. साखर कारखानदारी महाराष्ट्रातील महत्त्वाची कारखानदारी आहे. साखर निर्यातीवर बंदी घातली. शेतकरी संकटात जाईल कसा याचे काम राज्यकर्ते करत असल्याचे पवार म्हणाले.

एकजुटीच्या बळावर महाराष्ट्राचे चित्र बदलू
आपल्याला पुढच्या काळात एकजूट उभा करावी लागेल. मी तुम्हाला खात्री देतो की, एकजुटीच्या बळावर सबंध महाराष्ट्राचे चित्र बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे शरद पवार म्हणाले. पण माझी एक तक्रार आहे. सगळेजण म्हणतात तुम्ही ८३ वर्षांचे झाले, ८४ वर्षांचे झाले, पण मी म्हातारा झालो नाही. आणखी लय भारी लोकांना सरळ करण्याची ताकद माझ्यात असल्याचे शरद पवार म्हणाले.

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील ‘मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुधीर विठ्ठल मुंगसे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केळगांव- च-होली (खुर्द) येथे दिनांक १३ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान ‘साहेब केसरी बैलगाडा शर्यतीचे’ आयोजन केले होते. या बैलगाडा शर्यतीच्या अंतिम लढती पाहण्यासाठी शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासह माजी आमदार विलास लांडे तसेच शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने ग्रामीण अर्थव्यवस्थेला संजीवनी देणा-या आणि ग्रामीण संस्कृतीचे भूषण असणा-या स्पर्धा पुन्हा सुरू झाल्याचा विशेष आनंद झाल्याचे शरद पवार म्हणाले.