इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शिंदे-भाजप सरकारची मदत घेणार; संजय राऊत यांचं मोठं विधान

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शिंदे-भाजप सरकारची मदत घेणार; संजय राऊत यांचं मोठं विधान

मुंबई, (प्रबोधन न्यूज )  -  येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी     इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला किमान पाच राज्यांचे मुख्यमंत्री येणार आहेत. तसेच अनेक महत्त्वाचे नेते मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आम्ही राज्य सरकारची मदत घेणार आहोत. राज्य सरकारची मदत आम्हाला लागेल. आमचे काही नेते राज्य सरकारशी संवाद साधून नेत्यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न मार्गी लावतील, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना दिली.

आज वरळीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत, सुभाष देसाई आणि इतर नेते उपस्थित होते. सुमारे दोन तास ही बैठक चालली. त्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधून बैठकीचा तपशील दिला.

दोन दिवस बैठक

इंडिया आघाडीची आज बैठक झाली. पाटणा, बंगळुरूनंतर आता मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ग्रँड हयातला ही बैठक होईल. 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी बैठक सुरू होईल. त्या दिवशी संध्यकाळी उद्धव ठाकरे यांनी डिनरचं आयोजन केलं आहे. 1 ऑगस्टला बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

शिवसेनेकडे यजमानपद

मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचं यजमानपद शिवसेनेकडे आहे. काँग्रेस आणि शिवसेना आमच्यासोबत आहेत. आम्ही एकत्र काम करू, असं आजच्या बैठकीत ठरलं. बैठकीच्या अनुषंगाने प्रत्येकाकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्या. पाटणा आणि बंगळुरूप्रमाणे ही बैठक यशस्वी होईल. पुढच्या कामाला आम्ही सुरुवात करू. बैठक यशस्वी करण्यावर सर्वांचं एकमत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सरकारशी संवाद साधू

राज्यात आमचं सरकार नाही. यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी बैठक झाली. तिथे आमच्या घटक पक्षांचं सरकार होतं. इथे आमचं सरकार नाही. त्यामुळेही बैठक आमच्यासाठी निश्चितच एक टास्क आहे. किमान पाच राज्यांचे मुख्यमंत्री मुंबईत येणार आहेत. बिहार, तामिळनाडू, दिल्ली, बिहार झारखंडचे मुख्यमंत्री येणार आहेत. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसहीत अनेक बडे नेतेही येणार आहेत.

आम्ही सरकारशी संवाद साधू. आम्हाला राज्य सरकारच्या सहकार्याची गरज आहे. कारण एवढे नेते आल्यावर सुरक्षा व्यवस्थेचा ताण पडू शकतो. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू. आमचे काही नेते सरकारशी समन्वय करतील, अशी माहितीही त्यांनी दिली.