भाजपच्या सत्ताकाळात झोपडपट्टीधारक हक्काच्या घरापासून वंचित – तानाजी खाडे

भाजपच्या सत्ताकाळात झोपडपट्टीधारक  हक्काच्या घरापासून वंचित – तानाजी खाडे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना हजारो झोपडपट्टीधारक आणि गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्काचे घर देण्यात आले. मात्र महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता आल्यापासून महापालिकेच्या माध्यमातून शहरात एकही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात न आल्याने शहरातील हजारो झोपडीधारकांना त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजप नेत्यांनी केल्याचा आरोप माजी नगरसेवक तानाजी खाडे यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली शहरात संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक 14 यमुनानगर, त्रिवेणीनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तानाजी खाडे बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमास  शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविताताई आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका सुमनताई पवळे, माजी नगरसेवक शशीकिरण गवळी, विनायक रणसुंभे यांच्यासह रवी आप्पा सोनवणे, आलम शेख, अनिल भोसले, गंगाताई झेंडे, मनिषा गटकळ, बाबू शेट्टी, राहूल येवले, प्रसात कोलते, प्रिया कोलते व प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना तानाजी खाडे म्हणाले, महापालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना 15 हजारांहून अधिक घरे बांधण्यात आली. त्याद्वारे झोपडपट्टीधारकांना तसेच अल्प उत्पन्न गटातील गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे घर देण्यात आल्याने या नागरीकांचा सुखाचा संसार आहे. मात्र 2017 साली भाजपाची सत्ता महापालिकेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून शहरात एकही गृहप्रकल्प उभारण्यात आलेला नाही. आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्या भाजप नेत्यांनी त्यांच्या स्वार्थापोटीच शहरात एकही प्रकल्प होऊ दिलेला नाही.

गोरगरीबांना फसवी आश्वासने देऊन त्यांची मते मिळविणाऱ्या या नेत्यांना झोपडपट्टीधारक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिक यापुढे थारा देणार नाहीत याचा विश्वास आहे. गोरगरिबांना त्यांचे हक्काचे घर मिळू न देणाऱ्यांमध्ये भाजपाच्या नेत्यांचा व त्यांच्या बगलबच्च्यांचा हात आहे. याच पक्षाच्या नगरसेवकांनी आपली दुकानदारी चालविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत केलेल्या दुर्देवी कारभाराला आता येथील जनता विटली असून या लोकांनी केलेल्या पापामुळे गोरगरीब जनतेला घरापासून वंचित रहावे लागले. महापालिकेमध्ये सत्ता आल्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून शहरात झोपडपट्टीधारकांसाठी तसेच अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृहप्रकल्प उभारण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असेही खाडे यावेळी म्हणाले.