राममंदिर लोकार्पणाच्या अक्षता घरोघरी देणार

राममंदिर लोकार्पणाच्या अक्षता घरोघरी देणार
पिंपरी (प्रबोधन न्यूज )  -  अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार असून त्यासाठी घरोघरी अक्षता देऊन या सोहळ्याचे आमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री प्रा. संजय मुदराळे, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, प्रांत समरसता सहप्रमुख निखिल कुलकर्णी यांनी दिली.
दिनांक ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी देशभरातील निवडक २०० कार्यकर्त्यांना श्रीराम जन्मभूमी मंदिरात पूजलेल्या अक्षता, प्रभू श्रीरामाचे छायाचित्र आणि माहितीपत्रक दिले जाईल. त्यासाठी विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, प्रांत समरसता सहप्रमुख निखिल कुलकर्णी हे अयोध्येला रवाना झाले आहेत.
अयोध्येतून आणलेल्या अक्षतांचे दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी विधिवत पूजन करून नंतर घरोघरी आमंत्रण म्हणून त्या देण्यात येतील. अयोध्येत मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व भाविकांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने 'माझे गाव माझी अयोध्या' या संकल्पनेनुसार भाविकांनी आपले गाव, आपला परिसर, घरीदारी धार्मिक अनुष्ठान, नामसंकीर्तन करीत स्थानिक मंदिरात महाआरती, प्रसाद वितरण करून लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखवून आनंदोत्सव साजरा करावा. यानिमित्त परिसरात रांगोळ्या, घरांवर भगवे ध्वज आणि पताका लावून परिसर सुशोभित करावा; तसेच सायंकाळी घरांसमोर किमान पाच दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रांतसह मंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी केले आहे.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची, रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येला राममंदिरात होणार आहे. त्याआधी देशभर दिनांक १ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत व्यापक जनसंपर्क होणार आहे. २२ जाने २०२४ ला मंदिर केंद्रित कार्यक्रम सर्व गावात आणि वस्तीत होणार असून सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी केले आहे.