महापालिका अतिरिक्‍त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली, त्यांच्याजागी विजयकुमार खोराटे यांची नियुक्ती

पिंपरी,  (प्रबोधन न्यूज )    - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांना त्यांच्या मूळ महसूल व वन विभागाकडे परत पाठविण्यात आले आहे.
 
अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर बदल होण्याच्या शक्‍यता वर्तविल्या जात होत्या. त्याचा प्रत्यत महापालिकेत आला असून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले अतिरिक्त आयुक्त (2) जितेंद्र वाघ यांचा आज बदली आदेश जारी करण्यात आला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाकडील शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी हा आदेश काढला आहे.

पालिकेतील अतिरिक्त आयुक्त (2) जितेंद्र वाघ यांची बदली होताच त्यांच्या जागी विजयकुमार खोराटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खोराटे यांनी यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आकाशचिन्ह परवाना विभाग, आरोग्य विभाग आणि भूमी व जिंदगी विभागात सहायक आयुक्त पदावर काम केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय सेवेत दीड वर्ष सेवा केल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेत पदोन्नती देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा त्याठिकाणाहून पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त (2) पदावर पदोन्नती देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.